राणांना केंद्र सरकारची विशेष सुरक्षा, यापुढे त्यांनी स्मशानात गौऱ्या रचूनच यावे...

शिवसेनेला सत्तेची परवा नाही. शिवसेना, मातोश्रीच्या नादाला कुणी लागले तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं, अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राणा दाम्पत्यासह भाजपचाही समाचार घेतला.
राणांना केंद्र सरकारची विशेष सुरक्षा, यापुढे त्यांनी स्मशानात गौऱ्या रचूनच यावे...
Sanjay Raut, Ravi Rana and Navnit RanaSarkarnama

नागपूर : मुंबईत नौटंकी करण्यासाठी राणा दाम्पत्याला केंद्र सरकारने विशेष सुरक्षा दिली असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. बायकांच्या आडून भाजप हे उद्योग करीत असून महाराष्ट्रात सेनेला पुरून उरण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. शिवसैनिक नेहमीच मरायला व मारायला तयार असतो, परंतु सत्तेमुळे आमचे हात बांधले आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेला (Shivsena) सत्तेची परवा नाही. शिवसेना, मातोश्रीच्या नादाला कुणी लागले तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं, अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आज राणा दाम्पत्यासह (Ravi Rana and Navnit Rana) भाजपचाही समाचार घेतला. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, अन्यथा २० फूट खाली गाडले जाल, असे नमूद करीत राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय स्टंटबाजीवर संताप व्यक्त केला.

खासदार संजय राऊत तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सिव्हिल लाइन्स येथील आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राणा दाम्पत्यांच्या नौटंकीमागे भाजपचाच हात असल्याचा आरोप केला. खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा महाराष्ट्राचे शत्रू असून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागे उभे राहतात. राणा दाम्पत्यावर त्यांचे प्रेम उतू चालले, असा टोलाही त्यांनी लगावला. खासदार नवनीत राणा यांचा हिंदुत्वाचा काय संबंध? अयोध्या आंदोलन, श्रीरामाचं नाव घ्यायला त्यांचा विरोध होता.

या बोगस हिंदुत्ववादी लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप काम करीत आहे. सेनेचे हिंदुत्व हे घंटाधारी नाही, तर गदाधारी आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सेनेने गदा, तलवार घेतली आहे. सेनेला कुणी हिंदुत्व शिकवू नये, असेही ते म्हणाले. राष्‍ट्रपती राजवट कशी लागते, हे आम्हाला माहिती आहे. पहाटे शपथविधी घेऊन राष्ट्रपती राजवट उठवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. कायदा कुणाला शिकवायचा असेल तर राज्यपालांना शिकवा, असा टोला हाणत राज्यपाल गेल्या अडीच वर्षांपासून महत्त्वाच्या फाईल्सवर बसले आहे, असेही खासदार राऊत म्हणाले.

यापुढे अमरावती सेनेचेच..

बोगस जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. उच्च न्यायालयानेही बोगस प्रमाणपत्रावर शिक्कामोर्तब केले. आता सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात नवनीत राणा यांना केंद्र सरकारची मदत मिळत आहे. परंतु यापुढे अमरावती हे शिवसेनेचेच असेल. त्या कशा निवडून येतात, तेच बघतो, असे आव्हान त्यांनी दिले.

Sanjay Raut, Ravi Rana and Navnit Rana
Video: आता त्यांचेच हात जळणार आहेत...; संजय राऊत

पंतप्रधान दौऱ्याच्या नावावर काढला पळ..

राणा दाम्पत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या सबबीखाली पळून गेले. या दौऱ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. काही लोक या दौऱ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु गालबोट लावणाऱ्यांचा समाचार घेण्याची ताकद शिवसेनेत आहे. सेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न हा पुचाटपणा आहे. राज्यात महाभारतातील शिखंडीला लाजवेल, असे राजकारण सुरू असल्याचेही ते म्हणाले.

सत्तेची परवा नाही..

मातोश्रीची रेकी करण्याचा काल प्रयत्न झाला. शिवसैनिक चाल करून गेले. यापुढेही असा प्रयत्न झाल्यास शिवसैनिक पुन्हा चाल करून जातील. सत्तेची परवा आम्हाला नाही, तुम्हालाच आहे. त्यामुळे स्वतःची हिंमत नसल्याने शिखंडीच्या आड हल्ले करण्यात येत आहे. त्यांचा लक्ष्यभेद केला जाईल. नवं महाभारत घडविण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.