
ललित कनोजे
Nagpur District APMC Election News : रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९५ टक्के मतदान झाले असून १८ जागांसाठी ५५ उमेदवारांच्या नशीबाचा फैसला आज (ता. २९) दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे. येथे चौरंगी लढत असून केदार गट आणि आशीष जयस्वाल गटाने युती केली आहे. (Kedar group and Ashish Jaiswal group have formed an alliance)
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काल (ता. २८) मतदान पार पडले. सेवा सहकारी, ग्रामपंचायत, व्यापारी अडते व हमाल मापाडी या चारही मतदारसंघांत एकूण १ हजार ५६ मतदारांपैकी १ हजार २ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सेवा सहकारी मतदार संघात २४३ पैकी २३३, ग्रामपंचायत ५०५ पैकी ४७२, व्यापारी-अडते २५६ पैकी २४९ व हमाल मापाडी ५१ पैकी ४८ मतदारांनी मतदान केले.
सर्व उमेदवारांचे भाग्य मतदान पेटीत बंद झाले असून आज शनिवारी सकाळी स्व.घनशामराव किंमतकर सभागृहात मतमोजणी सुरू झाली आहे. वर्षानुवर्षे नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणावर दबदबा ठेवणाऱ्या माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांना स्थानिक आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांचेशी युती करावी लागली. त्यांनी सहकार पॅनल निवडणुकीत उतरवले आहे.
केदारांचे कट्टर समर्थक असलेल्या सचिन किरपान, मिन्नू गुप्ता यांच्यासारख्या सहकार क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी सहकार पॅनेल मैदानात उतरवले. त्यामुळे आमदार केदारांना ऐनवेळी आमदार जयस्वाल यांच्याशी सर्व प्रकारचे राजकीय मतभेद विसरून युती करावी लागली. तसेच या निवडणुकीत भाजपचे नेते डी. एम. रेड्डी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी या निवडणुकीत शेतकरी विकास सहकार पॅनेलच्या माध्यमातून काँग्रेसचे गज्जू ऊर्फ उदयसिंह यादव यांचेशी युती केली.
या निवडणुकीत गटा-तटा च्या राजकारणाला मोठा ऊत आल्याने सर्वांनी मोठ्या ताकदीने प्रतिष्ठा लावली होती. पण निवडणूक संपताच विविध चर्चांना उधाण आले असून सहकार सेवा संघात आमदार सुनील केदार व आशिष जयस्वाल यांच्या सहकार पॅनेलची थेट लढत आमदार केदार यांचे निष्ठावान मानले जाणारे सचिन किरपान व मिन्नू गुप्ता यांनी त्यांच्या विरोधात उभे केलेल्या शेतकरी सहकार पॅनेलसोबत सरळ लढत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामपंचायत गटात तिरंगी सामना होण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये आजी-माजी आमदार व निष्ठावान कार्यकर्ते अशी होणार असल्याची शक्यता आहे. तर व्यापारी-अडते व हमाली मापाडीमध्ये सुद्धा आमदार केदार, जयस्वाल यांच्या तर निष्ठावान विरुद्ध सामना होणार असल्याची चर्चा आहे. तसेच हमाल मापारी या मतदारसंघात फक्त ५१ मतदार होते. तिथे किरपान यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलचे उमेदवार शंकर तांबुलकर यांचा एकतर्फी विजय होणार असल्याचे समजते.
कुहीत ९७ तर पारशिवनीत ९६ टक्के मतदान..
पारशिवनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) झालेले मतदानाची टक्केवारी ९५.४६ टक्के मतदान झाले. १ हजार १६ पैकी ९७० मतदान झाले. बाजार समितीमध्ये केदार (Sunil Kedar) गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कुही-मांढळ बाजार समितीमध्ये ९७ टक्के मतदान झाले आहे. एकूण ५५९ मतदार असून यातील ५४७ मतदारांनी आपला हक्का बजावला. (Congress) कॉंग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.