रामदास आठवलेंनी रिपब्लिकन ऐक्याचा नाद सोडला...

रामदास आठवलेंनी Ramdas Athavale रिपब्लिकन ऐक्याचा नाद सोडला असे त्यांच्या भूमिकेवरून आता जाणवू लागले आहे.
Ramdas Athavale RPI
Ramdas Athavale RPISarkarnama

नागपूर : फेब्रुवारी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक होत आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत लढण्याची पूर्ण मानसिकता रिपाइंचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बनवली आहे. नव्हे तशी घोषणाच त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. समाजातील कार्यकर्ते अजूनही रिपब्लिकन ऐक्याचे तुणतुणे वाजवताना दिसतात. पण रामदास आठवलेंनी रिपब्लिकन ऐक्याचा नाद सोडला असे त्यांच्या भूमिकेवरून आता जाणवू लागले आहे.

गटागटांत विखुरलेले रिपब्लिकन नेते एक होतील आणि पुन्हा नवी क्रांती होऊन सर्व जनतेला सत्तेत वाटा मिळेल, अशी आस समाजातील लोक लावून बसले आहेत. या ऐक्यासाठी केंद्र सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांसोबत बसलेल्या आठवलेंकडून समाजबांधवांना मोठ्या अपेक्षा आहेत. खूप लढलो बेकीने, आता लढुया एकीने, असा नारा देत आज ना उद्या नेते एकत्र येतील आणि संपूर्ण रिपब्लिकन जनता शक्ती एकवटून लढा देतील, अशी स्वप्नं बघत असलेल्या जनतेची आठवलेंच्या आजच्या वक्तव्याने निराशा झाली, असा सूर रिपब्लिकन जनतेमध्ये उमटत आहे. आठवले यांचा पक्ष पूर्णतः भाजपसोबत आणि भाजपवरच अवलंबून झाल्याने रिपब्लिकन ऐक्य होईल, ही आशा मावळली असल्याचे दिसत आहे.

आज दुपारी रवी भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आठवलेंनी पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशमधील निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आहेत. तेथे स्वबळावर लढून आम्हाला यश येणार नाही. आम्ही केंद्र सरकारचा एक घटक पक्ष आहो. त्यामुळे भाजपसोबतच तेथे लढण्याचा आमचा विचार आहे. शक्तिपरीक्षणासाठी तेथे रॅली काढणार आहोत. त्यानंतर लढण्याबाबत निर्णय घेतला जाईल. हे सांगताना रिपब्लिकन ऐक्याबाबत त्यांनी अक्षरही काढले नाही.

एकटे निवडणूक लढल्यास पराभव होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे पडण्यासाठी उभे राहण्यापेक्षा निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने उभे राहता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आरपीआयला त्या निवडणुकीत सोबत घेईल, याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या साथीने आम्ही उत्तर प्रदेशात यश मिळवू. भाजपला आमचा फायदाच होणार आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांना फारशी मते मिळाली नाही आणि भाजपच्या ९५ जागा या फक्त ५०० ते १५०० मतांच्या फरकाने हरलेल्या आहेत. हा फरक जर भरून काढता आला असता, तर भाजपला १८० ते १९० जागांवर विजय मिळाला असता, असे आठवले म्हणाले.

Ramdas Athavale RPI
रामदास आठवले म्हणाले, आम्ही काटा काढून छापा टाकतो...

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होण्यात कुठलीही अडचण येणार नाही. मागच्या वेळी ३१२ जागा मिळाल्या होत्या, यावेळीही ३००चा आकडा पार करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. जम्मू काश्‍मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर तेथे तिरंगा फडकला आहे. मी दोन वेळा जम्मू आणि काश्‍मीरला जाऊन आलो. तेथील मुस्लीम लोकांनी माझे चांगले स्वागत केले. जनतेमध्ये चांगले वातावरण आहे. केवळ नेत्यांकडूनच विरोध होतो आहे. आतंकवादी तेथे पुन्हा पुन्हा हल्ले करत आहेत. त्यामुळे तेथे सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्‍यकता पडू शकते, असे अमित शहा म्हणाले. पण त्या स्ट्राईकचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीशी काही संबंध नाही, असे आठवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com