राज्यसभा निवडणूक : विदर्भातून जाणार उमेदवारांच्या विजयाचा मार्ग...

विदर्भातील (Vidarbha) अपक्ष आमदार आपल्या सद्सदविवेकबुद्धीने मतदान करतील, असे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी सांगितले.
Rajyasabha Election, Kishor Jorgewar, Vidarbha.
Rajyasabha Election, Kishor Jorgewar, Vidarbha. Sarkarnama

नागपूर : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीची दारोमदार बऱ्यापैकी अपक्ष आमदारांवर अवलंबून आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अपक्ष आमदारांचे अजूनही काही ठरलेले नाही. विदर्भात ८ अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे राज्यसभा सदस्यांच्या विजयाचा मार्ग विदर्भातूनच जाणार आहे.

विदर्भात (Vidarbha) अमरावती जिल्ह्यात बडनेऱ्याचे आमदार रवी राणा, अचलपूरचे आमदार राज्यमंत्री बच्चू कडू, (Bacchu Kadu) मोर्शीचे देवेंद्र भुयार आणि बच्चू कडुंच्याच प्रहार जनशक्तीचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, (Kishor Jorgewar) पूर्वाश्रमीचे शिवसेना पण २०१९ मध्ये नागपूर जिल्ह्याच्या रामटेकमधून अपक्ष निवडून आलेले आशिष जयस्वाल, भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर आणि गोंदियाचे विनोद अग्रवाल हे आठ आमदार आहेत.

विदर्भातील आठ आमदारांपैकी कुणाचेही अद्याप नक्की काही ठरलेले नाही. पण अपक्ष आमदार आपल्या सद्सदविवेकबुद्धीने मतदान करतील, असे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. संभाजी राजेंनी अद्यापही आम्हा अपक्षांसोबत चर्चा केलेली नाही. राज्यसभा निवडणुकीबाबत अपक्ष आमदारांची बैठक होणार होती, पण ती अद्याप झाली नसल्याचेही ते ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले. त्यामुळे विदर्भातील अपक्ष आमदारांचा कल कुठे झुकतो, यावरही उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

महाविकास आघाडी आणि भाजप, दोन्ही बाजूंनी अपक्षांना जाळ्यात खेचण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश अपक्ष आमदारांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. या अपक्ष आमदारांची बैठक झालेली नाही. या निवडणुकीबाबत अपक्ष आमदार सध्यातरी कोणत्या निर्णयावर पोहोचलेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजप नेतेही काळजीत पडल्याचे दिसून येत आहे.

Rajyasabha Election, Kishor Jorgewar, Vidarbha.
राज्यसभा निवडणूक : MIM आमदाराला मोठी ऑफर!

महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक होणार असून सध्या भाजपकडे तीन जागा आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे प्रत्येक एक जागा आहे. सध्याचे संख्याबळ पाहता भाजपला दोन जागा मिळतील. तर आघाडीने आकडे जुळवून आणल्यास एका जागेचा फायदा होऊ शकतो. राज्यात एकूण 29 आमदार हे छोट्या पक्षांचे किंवा अपक्ष आहेत. त्यांचा पाठिंबा मिळाल्यास राज्यसभेतील चित्र बदलू शकते. महाविकास आघाडीकडे 170 मते असल्याचे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अडीच वर्षांपूर्वी दिसून आले होते. यातील किती मते भाजप आपल्याकडे वळविणार, याची उत्सुकता आहे.

विदर्भातील एका अपक्ष आमदाराशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीच ठरले नसल्याचे सांगितले. हे आमदार मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला हजर होते. तरीही त्यांनी असे उत्तर दिल्याने या निवडणुकीत अपक्ष मंडळी काही चमत्कार तर करणार नाहीत नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in