Raj Thackerayराज ठाकरे १७ पासून नागपुरात; चंद्रपूर आणि अमरावतीवरही करणार फोकस

१७ आणि १८ तारखेला राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भात असतील, अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी ‘सरकारनामा’ला दिली.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हल्ली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-मनसे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असला तरी आगामी महापालिकेची निवडणूक भाजप-मनसे एकत्र लढणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. सोबतच चंद्रपूर आणि अमरावती या महानगरपालिकांच्याही निवडणुका मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच विदर्भाचा (Vidarbha) दौरा करणार आहेत. येत्या १७ तारखेला ते नागपूरला (Nagpur) येणार आहेत. येथून चंद्रपूर (Chandrapur) आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. या दौऱ्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते चर्चा करतील. आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षाचा विचार सुरू आहे. इतर पक्षाचे लोक मनसेमध्ये (MNS) प्रवेश करतील, त्यादृष्टीनेही तयारी सुरू झालेली आहे. १७ आणि १८ सप्टेंबर असे दोन दिवस राज ठाकरे विदर्भात असतील, अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी ‘सरकारनामा’ला दिली. या दौऱ्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, अमरावती जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील चार दिवस आधी नागपुरात तळ ठोकून बसणार आहेत. या कालावधीत दौऱ्याच्या तयारीचा आढावा हे नेते घेणार असल्याचेही उंबरकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडीची एकत्रित ताकद कमी करण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे सोबत लढणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. याचीच चाचपणी करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे नागपूरला येत आहेत. भाजप आणि शिवसेनेतील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणे शक्य नाही. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा एकत्रितपणे लढण्यासाठी मास्टर प्लान आखला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यापूर्वीच महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने काँग्रेस यास फारसा विरोध करणार नाही. मात्र विदर्भ आणि खासकरून नागपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांचा आघाडीला विरोध आहे.

Raj Thackeray
अमित शहा - राज ठाकरे भेटीची शक्यता : भाजप मनसे युतीचे संकेत

नागपूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. सेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे काँग्रेस दीडशे पैकी पन्नास जागाही सोडायला तयार नाही. त्यांची ताकद वाढवून आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा नाही, असे येथील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. हे जरी खरे असले तरी महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास बऱ्यापैकी भाजपला रोखण्यात यश येऊ शकते, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर वरिष्ठांकडून दबाव आल्याने आघाडी होण्यास कोणी रोखू शकणार नाही, असे सर्वांचेच म्हणणे आहे. त्यामुळे भाजप सावध आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढण्यास भाजपला त्याचा फारसा त्रास होणार नाही.

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे, याकरिता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे. ज्या भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोनचार टक्के मतांचे विभाजन झाले तरी भाजप-मनसे युतीचा उद्देश साध्य होणार आहे. नवे राजकीय समीकरण तयार झाल्यास नागपूर महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते. याचा फायदा मनसेला चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in