हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना जाळ्यात ओढले !

१९९१ साली छगन भुजबळ यांनी केलेले बंड हे शिवसेनेतील आजवरचे सर्वात मोठे बंड होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या तहाचे काय होते, ते कळेलच.
Eknath Shinde and Devendra Fadanvis
Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे नगररचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळपासून महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. आपले समर्थक आमदार घेऊन ते गुजरातमधील सुरत येथे हॉटेलमध्ये बसले आहेत. तेथे बसून शिवसेनेसोबत तह करण्याच्या तयारीत ते आहेत. हा त्यांचा तह कितपत यशस्वी होतो, हे येणारा काळच सांगणार आहे. पण ते शिवसेनेतून बाहेर पडल्यास हे शिवसेनेतील आजवरचे सर्वात मोठे बंड ठरणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदेंना जाळ्यात ओढल्याचेही बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून महाराष्ट्रात राजकीय भूकंप केला आहे. पण याची खलबतं मात्र गुजरातमध्ये सुरू आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपमध्ये या, असा निरोप शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवला आहे. यासाठी त्यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आधार घेतला आहे. ‘बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवले’, असे ट्विट त्यांनी आज केले. आता एकनाथ शिंदेंचे बंड मोडून काढणे किंवा त्यांच्या अटी मान्य करणे, हे दोन मार्ग शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सध्यातरी दिसत आहेत. यातून तिसरा मार्ग त्यांना सापडतो का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

भुजबळांनी केले होते मोठे बंड..

शिवसेनेमध्ये आजवर झालेल्या बंडखोरीची माहिती घेतल्यास १९९१ पासून या पक्षाला बंडाचा इतिहास आहे. १९९१ साली छगन भुजबळ यांनी पक्षाच्या विरोधात बंड केले होते. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. ९ आमदार घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. मुख्यमंत्री किंवा कोणत्या मंत्रिपदासाठी त्यांचे हे बंड नव्हते, तर विरोधी पक्षनेते पदासाठी त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला होता. याला ओबीसी चळवळीची पार्श्‍वभूमी असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. ९ आमदारांमध्ये विदर्भातील कृष्णराव इंगळे, दाळू गुरूजी, राजेंद्र गोळे आणि जगन्नाथ ढोणे यांचा समावेश होता.

Eknath Shinde and Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस १० दिवसांपूर्वीच म्हणाले होते की, हा पत्त्यांचा बंगला...!

नाईक, नवले आणि गावंडेंनीही केला होता जय महाराष्ट्र..

१९९१च्या नंतर १९९७-९८ मध्ये गणेश नाईक, सुरेश नवले आणि गुलाबराव गावंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बंड केले होते. नंतर हे बंड शमले होते आणि गुलाबराव गावंडे पुन्हा शिवसेनेत आले. मात्र २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी कॉंग्रेसची घड्याळ हातावर बांधली होती. त्यानंतर २००५ साली नारायण राणे सेनेतून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर आत्ता म्हणजे २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.

१९९१ साली छगन भुजबळ यांनी केलेले बंड हे शिवसेनेतील आजवरचे सर्वात मोठे बंड होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या तहाचे काय होते, ते कळेलच. पण त्यांनी जर का शिवसेना सोडली, तर हे शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com