पुरावे नष्ट करण्यासाठी धाड, सतीश उकेंच्या भावाचा आरोप..

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधातील आमच्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्यासाठीच ही धाड घातली असल्याचा आरोप प्रदीप उके यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.
Pradeep  Uke on Devendra Fadanvis
Pradeep Uke on Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : भाजप नेत्यांच्या विरोधात सातत्याने बोलणाऱ्या आणि कॉंग्रेस नेत्यांचे वकीलपत्र घेतलेल्या ॲड. सतीश उके यांच्या घरावर पहाटे ५ वाजता ईडीने धाड घातली. ६ तास कसून चौकशी केल्यानंतर सतीश उके व त्यांचे भाऊ प्रदीप यांना अटक करण्यात आली. भाजप नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आमच्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्यासाठीच ही धाड घातली असल्याचा आरोप प्रदीप उके यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.

सतीश उके (Satish Uke) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. त्यांतील एका प्रकरणाचा निकाल चार दिवसांत लागणार होता. त्यासाठी त्यांनी सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला व कागदपत्रांची पाहणी केली. फडणवीसांच्या विरोधातील पुरावे नष्ट करण्यासाठी ईडीने (ED) धाड घातली. कारण लॅपटॉपमध्ये फडणवीस यांच्या विरुद्धच्या केसेस, भविष्यातील केसेस, तसेच जज लोया केस, निमगडे केसचे पुरावे होते. फडणवीस यांच्याकडून काही लोकांना पैशाचे आमिष दाखवले होते. आमच्याकडे असलेले पुरावे ते नष्ट करतील, अशी भीती प्रदीप उके यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना फटाके लावणारे वकील सतीश उके यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय, ईडीने गुरूवारी धाड मारीत सतीश उकेंसह त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ताब्यात घेतले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने पार्वती नगरातील अॅड. उके यांच्या घरी धाड मारली. अॅड. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून त्यांनी भाजप नेत्यांच्या नाकी नऊ आणले होते. तेच त्यांना भोवल्याचे बोलले जाते.

काही आठवड्यांपूर्वी एका ६० वर्षीय महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

Pradeep  Uke on Devendra Fadanvis
नवाब मलिक यांच्या मालमत्तांबाबत `ईडी`ची नाशिकला झाडाझडती?

न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणी अॅड. उकेंनी सनसनाटी आरोप करीत अनेक महत्त्वाचे दावे केले होते. अॅड. सतीश उके यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आरोपही केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरुद्ध दाखल असलेला गुन्हा लपवला असल्याची तक्रार उके यांनी केली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी उकेंनी केली. अॅड. सतीश उके हे जेएमएफसी कोर्टात गेले होते. तेव्हा ही केस रद्द झाली होती. त्यानंतर उके यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. तेव्हा हे प्रकरण चालवण्याची परवानगी दिली. सत्र न्यायालयाच्या विरोधात फडणवीस उच्च न्यायालयात गेले होते. जिथे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय बाद ठरवण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अॅड. सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या शिवाय नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी दाखल केलेल्या याचिकेत अॅड. सतीश उके पटोलेंचे वकील आहेत. पटोले यांनी पंतप्रधान मोंदीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अॅड. उकेंनी नकली मोदीला पत्रपरिषदेत सादर केले होते. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चुलत मावसभावाला पत्रपरिषदेत सादर करीत त्यांच्यावर आरोप केले होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे गेल्या आठवड्यात तीन दिवस नागपुरात होते. त्यावेळी ॲड. सतीश उके यांनी त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत काय झाले, हे कळू शकले नाही. पण ईडीच्या कारवाईची कुणकुण तर त्यांना लागली नव्हती ना, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. पण आजच्या कारवाईने नागपुरात राजकीय वातावरण गरम झाले आहे, हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com