वडेट्टीवारांनी ‘ऑन द स्पॉट’ सोडविल्या समस्या, अन् गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले...

पालकमंत्री विजय वडेट्टीवार Grardian Minister Vijay Wadettiwar गावातील समस्यांवर विजय मिळविण्याचा निर्णय घेतात. त्यातून समस्यामुक्त गाव ही संकल्पना उदयास येते.
वडेट्टीवारांनी ‘ऑन द स्पॉट’ सोडविल्या समस्या, अन् गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले...
Vijay WadettiwarSarkarnama

चंद्रपूर : लहान लहान गावखेड्यांतील समस्याही लहानसहानच असतात. पण वर्षानुवर्षे त्या सुटत नाहीत. नागरिक गावपुढाऱ्यांच्या माध्यमांतून त्यासाठी प्रयत्न करतात. पण निगरगट्ट प्रशासन काही जागचे हलत नाही. पण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गावातील समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला, अन् ‘ऑन द स्पॉट’ चुटकीसरशी त्या सोडवल्याही. त्यानंतर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलले, त्याच्या चर्चा आजही जिल्ह्यात सुरू आहेत.

रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, विजेचा लपंडाव, कृषीपंपांना विजेची प्रतीक्षा, फेरफार अडले, अधिकारी मुख्यालयी राहत नाही... या साऱ्या समस्या बहुतांश गावाच्या सारख्याच. या समस्या सोडविण्यासाठी नागरिक, गावपुढारी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चकरा मारतात. महिनोंमहिने समस्या सुटत नाही. हे चक्र वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू असते. अखेर, नागरिक नशिबाला दोष देत जीवन जगत असतात. अशात पालकमंत्री विजय वडेट्टीवार गावातील समस्यांवर विजय मिळविण्याचा निर्णय घेतात. त्यातून समस्यामुक्त गाव ही संकल्पना उदयास येते. संपूर्ण जिल्हा प्रशासन गावात दाखल होते. अन् काही मिनिटांत अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या ऑन द स्पॉट सोडविल्या जातात आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले...

सावली तालुक्यातील पालेबारसा येथे पार पडलेल्या समस्यामुक्त गाव या अभियानातील हे चित्र आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला, हा संदेश दिला. मात्र, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनेक गावे समस्यामुक्त होऊ शकली नाहीत. अशात शेती उत्पादनातील घट आणि वाढती बेरोजगारी यामुळे अनेकजण शहराकडे धाव घेऊ लागले. मिळेल ती कामे करून शहरातच आपला उदरनिर्वाह करू लागले. त्यामुळे मागील काही वर्षांत खेडी ओस पडू लागली आहेत. हे चित्र मागील आठ-दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गावातील समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले आहे.

त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्यामुक्त गाव अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. अभियानाच्या शुभारंभासाठी सावली या तालुका मुख्यालयापासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावरील पालेबारसा या गावाची निवड करण्यात आली. त्यानंतर पालेबारसा आणि परिसरातील नागरिकांनी तालुका प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या लेखी स्वरूपात केल्या. चारही दिशेने जंगलाने वेढलेल्या या गावात सकाळपासूनच अधिकारी, कर्मचारी दाखल होऊ लागले. काही वेळानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे दाखल झाले. अभियानाच्या उद्घाटनाचा सोपस्कार काही मिनिटात आटोपण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार स्वतः कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

Vijay Wadettiwar
... तर मी राजीनामा द्यायला तयार आहे: विजय वडेट्टीवार

तालुका प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे सुरू केले. अर्जदार आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना समोरासमोर बोलावून वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपातील अशा तक्रारी जागेवरच सोडविल्या. क्लिष्ट स्वरूपातील समस्यांच्या पूर्ततेसाठी गावातील वीज सेवकांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अशा सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. त्यानंतर गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेत समस्यामुक्त गाव करण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या या अभियानाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सुटल्याने गावकऱ्यांनी वडेट्टीवार यांना मनापासून धन्यवाद दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.