शिवाजीत विकासावर ‘प्रगतीच' भारी, उद्या मतदान; आजीवन सभासदांच्या हाती संस्थेचे भविष्य

शिवाजी (Shivaji) संस्थेत नरेश ठाकरेंनी नातेवाइकांची केलेली भरती दाखवून हर्षवर्धन देशमुख यांनी ठाकरेंना बॅकफुटवर आणले आहे.
Harshawarhan Deshmukh, Shivaji Education Society, Amravati.
Harshawarhan Deshmukh, Shivaji Education Society, Amravati.Sarkarnama

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रगती आणि विकास पॅनलने एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून चिखलफेक करीत या निवडणुकीला वेगळ्याच वळणावर नेले आहे. विकास पॅनलकडून हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलच्या मागील पाच वर्षांतील कारभारावर आगपाखड झाल्यानंतर हर्षवर्धन देशमुखांनी आपल्यावरील खोट्या आरोपांना प्रत्युत्तर अतिशय चोखपणे देत आजीवन सभासदांसमोर पाच वर्षांतील विकासाचा आराखडा व संस्थेच्या भविष्याचा वेध घेत नवे व्हीजन मांडले आहे. तसेच शिवाजी (Shivaji) संस्थेत नरेश ठाकरेंनी नातेवाइकांची केलेली भरती दाखवून त्यांनी ठाकरेंना बॅकफुटवर आणले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेत आता विकास पॅनलच्या तुलनेत संस्थेचा मागील पाच वर्षांत खऱ्या अर्थाने विकासाचे ध्येय गाठणाऱ्या हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलचे पारडे भारी असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक येत्या ११ सप्टेंबरला होऊ घातली आहे. त्यासाठी ७११ आजीवन सभासद मतदानाचा हक्क बजावून संस्थेचे भविष्य पुन्हा एकदा निश्चित करणार आहेत. आजवर संस्थेच्या विकासावरच संस्थेच्या आजीवन सभासदांनी मतदान केले असून ज्यांनी आततायीपणाचा आव आणला, अशांना घरचा रस्ता देखील दाखविला आहे. संस्थेच्या आजवरच्या प्रवासात कधीही जातीयवाद अथवा खोट्या अपप्रचाराला संस्थेच्या सुजाण आणि भाऊसाहेबांचे समतावादी विचार धारण करणाऱ्या आजीवन सभासदांनी थारा दिलेला नाही. शिवाजी संस्थेच्या निवडणुकीत आजीवन सभासद हा महत्वाचा घटक असून ते दरवेळी संस्थेचे भविष्य निश्चित करत असतात. संस्थेचा आजवरचा इतिहास लक्षात घेता प्रत्येक अध्यक्षाला किमान दहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यामुळे सुरवातीपासून हर्षवर्धन देशमुख यांनी गत पाच वर्षात केलेली संस्थेची सर्वांगीण प्रगती आणि संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांचा केलेला कायापालट यामुळे संस्थेत पुन्हा एकदा 'प्रगती' ‘विकास' वर भारी पडणार, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

हर्षवर्धन देशमुख यांच्या कार्यकाळात संस्थेने मोठी प्रगती केली असून संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्याचे महत्वाचे कार्य करत त्यांनी गत पाच वर्षांत अनेक मोठे बदल संस्थेत घडवून शिवाजी संस्थेचे नाव जगभरात उंचावण्याचे काम केले आहे. हे देखील नाकारता येण्यासारखे नाही. त्यामुळे दोन्ही नेतृत्वाचा विचार करून आणि दोघांच्याही योगदानाची तुलना करूनच आजीवन सदस्यांना मतदान करताना योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. भाऊसाहेब देशमुखांनी पाया रचलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे नेतृत्व चुकीच्या हातात गेल्यास संस्थेची स्थिती पुन्हा काय होईल, याचाही विचार करून आजीवन सभासदांना मतदान करावे लागणार आहे.

निवडणुकीच्या काळातच संस्थेने साधली प्रगती..

एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना गत १५ दिवसात शिवाजी शिक्षण संस्थेने मोठी प्रगती साधली आहे. या काळात पीडीएमसी महाविद्यालयात स्त्रीरोग विभागाच्या चार जागा वाढल्या असून त्यामुळे संस्थेला दरवर्षी चार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. सोबतच शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला देखील नॅकचे A+ मानांकन मिळाले आहे. सोबतच पवनी येथील महाविद्यालयाला देखील नुकतेच B++ मानांकन प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे तर संस्थेला नुकतेच राज्य शासनाने बाळापूर तालुक्यातील निंभा येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मंजूर असून ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कार्यक्षेत्रात यंदा मंजूर झालेले एकमेव महाविद्यालय आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीमध्ये सतत वाढ होत असताना विरोधकांच्या प्रचाराला आजीवन सभासद बळी पडणार नाहीत, अशीही चर्चा शिवपरिवारात आहे.

पीडीएमसी मधील नियुक्त्या ठरणार‘गेम चेंजर'

पीडीएमसी महाविद्यालयात अनेक रिक्त पदांवर आजीवन सभासदांच्या वारसांना नोकरी देत हर्षवर्धन देशमुख यांनी आजीवन सभासदांची मने जिंकली आहेत. या नियुक्त्यांना विरोध करून ठाकरे यांनी मात्र सभासदांची नाराजी ओढवून घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे बहुतांश सभासदांमध्ये या निवडणुकीतबाबत उत्साहाचे वातावरण आहे.

नेतृत्वाच्या तुलनेत हर्षवर्धन देशमुखांकडे कल..

ठाकरे आणि देशमुख यांच्या नेतृत्वाची तुलना करता एकीकडे अभ्यासपूर्ण, सोज्वळ आणि सुशिक्षित नेतृत्व तर दुसरीकडे सहकार, शिक्षण, राजकारण यामध्ये दांडगा अनुभव असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे संस्थेचे आजीवन सभासद यांपैकी कोणाच्या हाती संस्थेच्या धुरा देतात, हे बघण्यासारखे आहे. परंतु तज्ज्ञांचा आणि राजकीय अभ्यासकांचा विचार करता सध्याच्या स्थितीत संस्थेत सुरू असलेल्या रणधुमाळीत निर्माण झालेल्या चिखलफेकीमुळे हर्षवर्धन देशमुख यांच्याच नेतृत्वाला प्राधान्य मिळेल, अशीच आशंका व्यक्त केली जात आहे. जनमताचा कौल घेतला असता संस्थेतील दोन परंपरागत काळमेघ आणि इंगोले गट एकत्र आल्याने हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल मोठ्या फरकाने विजयी होईल, असे चित्र दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in