
Nagpur Political News : एक पक्ष असताना दोन गट का पडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेना आपला मित्रपक्ष कधीच नव्हता, मग अचानक असे काय झाले होते की, आपण शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, असा सवाल करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवर (नाव न घेता) निशाणा साधला. (The party could not grow as the Vidarbha leaders did not support them)
विदर्भात नेत्यांनी साथ दिली नाही म्हणून पक्ष वाढू शकला नाही. आपल्या मागे कार्यकर्ते असतात, याची जाणीव आधीच्या नेत्यांनी ठेवली नाही. सत्ता हवी आहे म्हणून शिवसेनेसोबत गेले. त्यावेळी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्यावे, अशी आम्ही मागणी केली होती. शरद पवार यांनी मला उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन चर्चा करण्यास सांगितले होते. मी गेलो त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता, असेही पटेल म्हणाले.
आज (ता. २) राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात घेण्यात आला. त्यावेळी प्रफुल्ल पटेल बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही, ही बाब शरद पवार यांनीसुद्धा गांभीर्याने घेतली नाही. आमची संख्या ५४ असूनही अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याबाबत ते काही बोलले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात संधी मिळाली असती, ती त्यामुळे मिळाली नाही आणि पक्षाचा विकास, विस्तार होऊ शकला नाही. काँग्रेसने नेहमीच आपल्याला दुय्यम स्थान दिले. प्रत्येक वेळी केवळ आघाडी टिकवण्यासाठी आम्हाला तडजोड करावी लागली, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
आमचा पक्ष एक नंबरला जाऊ देणार का नाही, असा प्रश्न उपस्थित करून आम्ही सर्वसामान्य आणि अल्पसंख्याक यांना सोबत घेऊन जाणार आहो. यात कधीही तडजोड केली जाणार नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले. आम्ही राज्याच्या (Maharashtra) आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी भाजप (BJP) सोबत गेलो. काँग्रेस जर शिवसेनेसोबत (Shivsena) जाऊ शकते तर मग आम्ही भाजपसोबत गेलो तर काय हरकत आहे, असा प्रश्न करीत त्यांनी अजित पवार यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.
आम्ही महायुतीमध्ये गेलो म्हणून आम्हाला जागा मिळणार नाहीत, असं समजण्याचं कारण नाही. महायुतीमध्ये विदर्भात चांगल्या जागा घेऊ आणि जिंकूसुद्धा. पक्षाची आवक अजून सुरू राहणार आहे, कोण येणार, हे आताच सांगत नाही. वेळ आल्यावर त्याचा खुलासा करेन.
आठ सप्टेंबरनंतर पक्ष कोणाचा, हा निकाल लागणार असल्याचेही पटेल म्हणाले. जे वेळेत आले, त्यांनी शपथ घेतली. ज्यांना उशीर झाला, ते बाहेर झाले. ते (अनिल देशमुख यांचे नाव न घेता) पुण्यावरून येत होते, घाटातच अडकले, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.