चंद्रपुरात बाबूपेठच्या उड्डाण पुलावरून रंगले पोस्टरयुद्ध, काय आहे वास्तव ?

नगररचना विकास विभागाने आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) आणि आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) या दोघांनाही ५.२६ कोटी रुपये मंजूर केल्याचे पत्र पाठवले
चंद्रपुरात बाबूपेठच्या उड्डाण पुलावरून रंगले पोस्टरयुद्ध, काय आहे वास्तव ?
MLA Sudhir Mungantiwar and MLA Kishor Jorgewar LettersSarkarnama

नागपूर : चंद्रपूर (Chandrapur) शहरातील बाबूपेठच्या उड्डाणपुलासाठी नुकताच ५.२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर या कामाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. श्रेयासाठी पोस्टरबाजीही सुरू झाली. माजी अर्थमंत्री आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार या दोघांनीही हा निधी आपण आणल्याचा दावा केला आहे.

दोन्ही आमदारांनी केलेला दावा खरासुद्धा आहे. कारण नगररचना विकास विभागाने आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) आणि आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) या दोघांनाही ५.२६ कोटी रुपये मंजूर केल्याचे पत्र पाठवले आणि तेव्हापासून या कामाच्या श्रेयाचे राजकारण सुरू झाले. आमदार मुनगंटीवार यांना ३१ मे रोजी नगर रचना विकास विभागाने पाठविलेल्या पत्रावर नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांची स्वाक्षरी आहे, तर आमदार जोरगेवार यांना पाठविलेल्या पत्रावर नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी शरद किरवले यांची स्वाक्षरी आहे. हे दोन्ही पत्र काल ३१ मे रोजी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी श्रेय घेण्यासाठी कंबर कसली आहे.

खरं म्हणजे, बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार या दोघांनीही नगर रचना विभागाशी पत्रव्यवहार केला आणि त्याचा पाठपुरावा केला. विभागाने कुणाला प्रतिसाद दिला आणि निधी दिला, हे स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. दोघांनाही निधी मंजुरीचे पत्र दिल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. खरं तर या वादासाठी नगर रचना विभागालाच जबाबदार धरायला हवे, असा सूर उमटत आहे. निधी मंजुरीचे पत्र कुण्याही एकाच्याच नावाने असते, तर हा वाद सुरूच झाला नसता. त्यामुळे नगर रचना विभागानेच आता या प्रकरणावर पडदा टाकण्याची गरज आहे.

MLA Sudhir Mungantiwar and MLA Kishor Jorgewar Letters
Video: ".. मग गृहमंत्री कशाला पाहिजे", सुधीर मुनगंटीवार

आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या पत्रावर विवेक कुंभार यांची आणि आमदार किशोर जोरगेवार यांना दिलेल्या पत्रावर शरद किरवले यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे एकाच विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही का, असाही प्रश्‍न उपस्थित केला जातो आहे. अधिकारीही नेत्यांमध्ये वाटले तर गेले नाहीत ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

अवर सचिव म्हणाले, माहिती घेऊन सांगतो..

बाबूपेठ उड्डाणपुलाच्या मंजूर निधीबाबत ‘सरकारनामा’ने नगर रचना विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले, की याबाबत नेमके काय घडले, याची माहिती घेतो आणि नंतर काय ते सांगतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in