
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमानंतर रात्री बजाजनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयात एके काळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची उठबस होती. त्यामुळे नाना पटोलेंची उठबस असलेले ‘दुकान’ (कार्यालय) खुद्द पवारांनीच बंद केले.
जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रशांत पवार यांच्या वास्तुमध्ये हे कार्यालय थाटण्यात आले आहे. नाना पटोले राष्ट्रवादी कॉंग्रेसला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. परवा परवा बुलडाण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील दुकान बंद झाल्यात जमा आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात एकमेव दुकान उरले आहे. अन् ते बंद व्हायला असा किती वेळ लागणार आहे, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला डिवचले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांच्याव्यतिरिक्त कुणीही पटोलेंना प्रत्युत्तर दिले नव्हते. पण खुद्द पवारांनी शब्दांनी उत्तर न देता नाना पटोलेंचे नागपुरातील एक जुने ‘दुकान’ बंद करून टाकले.
पटोलेंच्या त्या वक्तव्याबद्दल काल पत्रकार परिषदेत विचारले असता पवार यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, काँग्रेस आणि आमची विचारधारा गांधी, नेहरूंची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसशी मिळतेजुळते विचार मांडतो. सत्तेत एकत्र असताना सहकारी पक्षांबद्दल काय आणि कसे बोलावे, याचे भान प्रत्येक पक्षातील सहकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. पटोले हे भाजपकडून खासदार झाले होते. त्यामुळे त्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर अजून असावा, येवढेच बोलून त्यांनी हा विषय संपवला आणि दिवसभराचे कार्यक्रम आटोपून रात्री विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी नागपूर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री सुबोध मोहिते, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, अनिल अहिरकर, माजी नगरसेवक राजेश माटे, अविनाश गोतमारे, नरेश अडसळे, भंडारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, रमण ठवकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मिलींद महादेवकर, रविंद्र इटकेलवार यांची उपस्थिती होती.
शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान अनेक कार्यक्रमांना पवार उपस्थिती लावत आहेत. नागपूरच्या बजाज नगर स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी चे कार्यकर्ता आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. पक्षाचे एक कार्यालय गणेशपेठ येथे आहेच आता या कार्यालयाची भर पडल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठी सोय होणार आहे. निवडणुका आणि इतर कुठल्याही विषयांसाठी येथे नियमित बैठका होतील. शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढविण्यासाठी हे कार्यालय उपयोगी पडणार आहे. येत्या निवडणुकीत महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कुठलीही कसर ठेवणार नाही, असा निर्धार प्रशांत पवार यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याजवळ व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.