पटेल हे पटोले यांचा पतंग कापत राहिले....मग नानाही डाव टाकू लागले

भंडाऱ्यात काँग्रेसकडून राष्ट्रवादीची मनधरणी सुरू होती. मात्र राष्ट्रवादीकडून म्हणजे पटेलांकडून (Prafull Patel) कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसने नानांच्या (Nana Patole) नेतृत्वात आक्रमक रणनीती अवलंबिली.
Prafull Patel and Nana Patole
Prafull Patel and Nana PatoleSarkarnama

नागपूर : विदर्भाच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असो की संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, हे दोघे पक्के वैरी समजले जातात. ‘सरकारनामा’ने यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, यासाठी भाईजींची डॉमीनेटींग भूमिका कारणीभूत असल्याचे वास्तव समोर आले. प्रफुल्ल पटेल इकडे भाईजी या नावाने ओळखले जातात.

एखाद्याला कुणाला गरीब-श्रीमंत वरून टोमणा मारायचा झाल्यास, ‘खुद को भाईजी समझ रहा क्या’, असे बोलले जाते. प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) आपल्या ईलाक्यात दुसऱ्या कुणाला मोठे होऊ देत नाही, आजपर्यंत त्यांनी कुणालाही आपल्यापेक्षा मोठे होऊ दिले नाही, असे येथील राजकीय जाणकार सांगतात. नेमका हाच प्रकार त्यांनी नाना पटोलेंसोबत (Nana Patole) केला. अगदी १९९९ सालापासून ते आमदार नाना पटोले आणि गोपाल अग्रवाल या ना त्या कारणाने भंडारा (Bhandara) गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या राजकारणात डावलत आले आहेत. त्यामुळेच की काय नाना पटोले यांनी २०१४ मध्ये आणि गोपाल अग्रवाल यांनी २०१९ मध्ये भाजपची वाट धरली होती, असेही सांगितले जाते.

...म्हणून नाना भाजपमध्ये गेले होते !

२०१४च्या पूर्वीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रात सोबत सत्तेत असताना त्यांनी भंडारा-गोंदियातून कुणाला मंत्रिपद मिळू दिले नाही. १९९९ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना गोपाल अग्रवाल यांचे मंत्रिपद जवळ आले असताना ते हिसकावून घेण्यात आले होते. हाच प्रकार नाना पटोलेंसोबत झाल्याने ते पटेलांचे वैरी बनले. २००९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत होते. पण त्यावेळी नाना पटोलेंना कॉंग्रेसचा राजीनामा दिला आणि अपक्ष लढले. या निवडणुकीत ते हरले, पण त्यांनी तब्बल २,५०,००० मते घेतली. अपक्ष म्हणून आपला टिकाव लागणार नाही, लक्षात आल्यावर २०१४ मध्ये ते भाजपकडून लढले आणि लोकसभेत पोहोचले, हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पटेल केंद्रामध्ये मंत्री असताना त्यांनी अहमद पटेल यांच्याकडून पटोलेंचे नाव कापले होते, असेही जाणकार सांगतात. पटेलांमुळेच भंडारा-गोंदियात भाजप वाढली, असेही बोलले जाते.

असे वाढत गेले वैर..

२०१९मध्ये नाना पटोले कॉंग्रेसकडून लढून आमदार झाले. त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. काही महिने तेथे राहिल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष झाले. पण ही दोन्ही पदे भूषवीत असताना एखादे मोठे काम ते विदर्भात आणू नाही शकले. कारण येथेही प्रफुल्ल पटेलांनी त्यांची अडवणूक केल्याचे सांगण्यात येते. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एखादे मोठे काम जर आले तर ते आपल्या नावावर असले पाहिजे, असा पटेलांचा आग्रह असतो. त्यामुळे विमानतळ असो किंवा एखादे इन्स्टिट्यूशन ते पटेलांच्याच नावावर जमा आहे. या सर्व बाबींमुळे पटेल आणि पटोले यांच्यातले वैर वाढत गेले. आजही प्रत्येक मुद्द्यावर दोघांमध्ये कडाडून विरोध होतो.

Prafull Patel and Nana Patole
Video: राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला : नाना पटोले चिडले

आताही टोकाचा विरोध..

नुकत्याच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पटेल आणि पटोले संघर्ष बघायला मिळाला. भंडाऱ्यात काँग्रेसकडून राष्ट्रवादीची मनधरणी सुरू होती. मात्र राष्ट्रवादीकडून म्हणजे पटेलांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसने आक्रमक रणनीती अवलंबून भाजपमधील माजी आमदार चरण वाघमारे यांचे नेतृत्व मानणाऱ्या पाच सदस्यांच्या गटासोबत हातमिळवणी केली. संदीप ताले यांच्या नेतृत्वातील या बंडखोर गटाने काँग्रेसला म्हणजेच पटोलेंना पाठिंबा दिला. हा गट व एक अपक्ष सदस्य यांच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे विजयी झाले. उपाध्यक्षपदी बंडखोर भाजपा गटाचे ताले आरूढ झाले. गोंदिया जिल्हा परिषदेतही नानांना मात कशी देता येईल याचेच प्रयत्न झाले. ५३ सदस्यीय गोंदिया जि.प.मध्ये २६ सदस्यीय भाजपला बहुमतासाठी केवळ एका मताची गरज होती. तेथे काँग्रेसचे १३ व राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले होते. अन्‍य सदस्यांमध्ये ४ सदस्य चावी संघटनेचे, तर २ सदस्य अपक्ष होते. येथे काँग्रेसला एकाकी पाडून भाजपचा अध्यक्ष, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला. या निवडणुकीनंतर 'राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला', या शब्दांत नाना पटोलेंनी संताप व्यक्त केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com