पंचायत समिती : राष्ट्रवादीने मोहाडीत गड जिंकला, मात्र सिंह गमावला...

मोहाडीत राष्ट्रवादीला (NCP) सभापती पद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आनंद साजरा होत असताना सभापती निवडीत जांभोरा गणाला डावलल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादीच्या 30 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
पंचायत समिती : राष्ट्रवादीने मोहाडीत गड जिंकला, मात्र सिंह गमावला...
Mohadi Panchayat Samiti NCPSarkarnama

भंडारा : भंडारा जिल्ह्यात आज पंचायत समितीच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सर्वत्र सत्ता स्थापनेचा घोडाबाजार बघता जिल्ह्यात ‘कही खुशी कही गम’चे वातावरण पाहायला मिळत आहे. मोहाडी पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) राष्ट्रवादी काँग्रेसने आज सत्ता मिळविली, भाजपच्या मदतीने मोहाडीत राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे.

मोहाडीत राष्ट्रवादीला (NCP) सभापती पद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आनंद साजरा होत असताना सभापती निवडीत जांभोरा गणाला डावलल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादीच्या 30 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे मोहाडीत राष्ट्रवादीने सत्ता मिळविली, मात्र तालुका उपाध्यक्ष गमावला अशी चर्चा सुरू झाली आहे. भंडारा (Bhandara) तालुका उपाध्यक्ष भूपेंद्र पवनकर हे पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राष्ट्रवादी गड जिंकला मात्र सिंह गमावला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मोहाडी पंचायत समिती सभापतिपदाची रस्सीखेच आता राष्ट्रवादी पक्षात दुफळी निर्माण करणारी ठरली आहे. सभापतिपद जांभोरा गणाला मिळावे, अशी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी होती. मोहाडीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. राष्ट्रवादी पक्षात वरठीचे रितेश वासनिक व जांभोऱ्याच्या प्रीती शेंडे यांनी दावेदारी केली होती. सभापतिपद करडी गणाच्या प्रीती शेंडे यांना मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. रितेश वासनिक सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आले आहेत. तर प्रीती शेंडे अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. त्या उच्च शिक्षित आहेत.

करडी परिसराला एकदाही सभापतिपद मिळाले नसल्याने यावेळी सभापती पद मिळावे, अशी अपेक्षा नाराज कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र अखेर रितेश वासनिक यांचे नाव पुढे येऊन मोहाडीत भाजपच्या समर्थनाने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे. आपल्या माणसाला सभापतिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या 30 पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्षांकडे राजीनामे पाठविले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आणि त्यांनी राजीनामे दिले असल्याचे बोलले जात आहे.

Mohadi Panchayat Samiti NCP
दोन आमदारांना जेलची हवा खायला लावणारा तुमसर-मोहाडी मतदारसंघ…

राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य कवड्डू मुंगमोडे, माजी सरपंच भूपेंद्र पवनकर, सरपंच वनिता राऊत, माजी उपसरपंच रमेश गोबाडे, सोसायटीचे माजी अध्यक्ष राजधर शेंडे, सुंदराबाई मुगुसमारे, उषा रामटेके, राजू भालाधरे, बाळकृष्ण बिसने, अरविंद बन्सोड, बाळकृष्ण शेंदरे, राधेश्याम उईके, राजकुमार बाघाडे, महेंद्र राऊत, रामचंद्र मुंगुसमारे, छबिलाल राऊत, सत्यवान राऊत, विश्वनाथ गोबाडे, राजकुमार मुंगुसमारे, विठ्ठल चांदेकर, निवृत्ती टेंभूरकर, मनोहर भगत, जयेंद्र टेभरकर, सुधाकर मांदूरकर, भिमराव गोबाडे, जनक भांडे, प्रवीण मादूरकर, दिलीप मेश्राम, राजकुमार गहाणे, कैलास राऊत यांचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे सत्ता स्थापन व दुसरीकडे नाराज कार्यकर्त्यांचे राजीनामे बघता मोहाडी राष्ट्रवादीत ‘कही खुशी कही गम’चे वातावरण पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.