झाले उलटेच : राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसाने शिवसैनिकांत भरला जोश...

अमरावतीपासून ते मुंबईपर्यंत शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झाले होते. विदर्भ एक्सप्रेसने जाण्याचे जाहीर करून राणा दाम्पत्य रात्रीच्या अंधारात नागपूरला जाऊन विमानाने चोरांसारखे पळून गेले.
Ravi and Navnit Rana
Ravi and Navnit RanaSarkarnama

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालिसा पठण करण्यावरून राज्यभर गदारोळ उभा केला. त्याला शिवसेनेने विरोध करून या गदारोळात आणखीन भरच टाकली. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र हा तमाशा बघतोय. यामध्ये नफा नुकसान कुणाचे झाले, याचा हिशेब केला तर फायदा शिवसेनेचाच झाल्याचे दिसते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या काळातील शिवसैनिक गेल्या चार दिवसांत पुन्हा बघायला मिळाला. त्याकाळी असे म्हटले जायचे की रॉकेलची कॅन आणि माचीस सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता कुठे असेल तर तो शिवसेनेतच आहे. राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा प्रकरणादरम्यान हा शिवसैनिक (Shivsena) महाराष्ट्राला पुन्हा बघायला मिळाला. अमरावतीपासून ते मुंबईपर्यंत शिवसैनिक आक्रमक झाले होते. विदर्भ एक्सप्रेसने जाण्याचे जाहीर करून राणा दाम्पत्य रात्रीच्या अंधारात नागपूरला जाऊन विमानाने चोरांसारखे पळून गेले. अमरावतीच्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला भगोडे सिद्ध केले.

मुळात कुणाच्याही घरी जाऊन तेथे हनुमान चालिसा वाटण्याचा अट्टहास चुकीचाच. पण वाचायचीच होती त्यांनी हनुमान चालिसा, तर वाचू द्यायची असती. ते आले असते, हनुमान चालिसा वाचली असती अन् निघून गेले असते. त्यांची येवढी दखल घेण्याची काहीच गरज नव्हती. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने राणा दाम्पत्याला प्रतिसाद देऊन विनाकारण मोठे केले, असे मानणारा एक वर्ग शिवसेनेत आहे. तर राणा दाम्पत्य कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर पोहोचू नये, असे मानणारा दुसरा वर्ग आहे आणि यांनीच मग राणांच्या खार येथील घरावर आणि मातोश्रीवर गर्दी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला.

गेल्या चार दिवसांत काहीही झाले असो, पण शिवसैनिक जागा झाला, हे मात्र खरे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यभरातील सैनिकांमध्ये जोश भरण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना वाटून दिली. त्यानुसार त्यांचे मंत्री, आमदार, खासदार राज्याच्या विविध भागांत जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. पक्षप्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एका महिन्यात दोन वेळा नागपुरात येऊन गेले. या नेत्यांच्या दौऱ्यांनी जे काम केले नाही, ते राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसाने केले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण तेव्हापासून शिवसैनिक आक्रमक झाला अन् रस्त्यावर उतरला.

Ravi and Navnit Rana
राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना नाशिकला गुन्हा दाखल होणार?

बाळासाहेब ठाकरे असताना अमरावती शिवसेनेचा गढ होता. पहिल्यांदा जेव्हा शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली होती, तेव्हा सेनेचे महाअधिवेशन अमरावतीमध्ये झाले होते. नागपुरात आलेले संजय राऊत परवा म्हणाले होते की, आता अमरावती आमचीच, शिवसैनिक अमरावतीमध्ये आता राणांना निवडून येऊ देणार नाही. त्यांचे हे वक्तव्य बोलके आहे. मागील काळात शिवसैनिकांवर मरगळ आलीही असेल, तर ती या प्रकरणाने झटकली गेली आणि भविष्यात राणांना रोखण्यासाठी अमरावतीमधील शिवसैनिक सज्ज झाले, असे म्हणता येईल. शिवसेना नेतेही या प्रकरणाकडे अशाच सकारात्मकतेने बघत असावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com