अधिकाऱ्यांनी ‘या’ रस्त्यावरून प्रवास करावा आणि २ हजाराचे बक्षीस घेऊन जावे…

यवतमाळ जिल्ह्याच्या झरी जामणी तालुक्यातील अहेरअल्ली या गावाचे सरपंच हितेश ऊर्फ छोटू राऊत (Hitesh - Chotu Raut) हे नेहमीच अभिनव पद्धतीने आपल्या परिसरातील प्रश्‍न मांडतात आणि कौशल्याने ते सोडवूनही घेतात.
Hitesh - Chotu Raut yavatmal

Hitesh - Chotu Raut yavatmal

Sarkarnama

पुणे : यवतमाळ जिल्ह्याच्या (Yavatmal District) झरी जामणी तालुक्यातील अहेरअल्ली या गावाचे सरपंच हितेश ऊर्फ छोटू राऊत (Hitesh - Chotu Raut) हे नेहमीच अभिनव पद्धतीने आपल्या परिसरातील प्रश्‍न मांडतात आणि कौशल्याने ते सोडवूनही घेतात. यावेळी त्यांनी भन्नाट कल्पना मांडली आणि तालुक्यातील एक मोठा प्रश्‍न चर्चेत आणला. आता त्यावर उपाययोजना केव्हा होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

झरी जामणी तालुक्यातील पाटण ते बोरी या जवळपास १५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. तालुक्यातील लोकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करण्याची धास्ती लोकांनी घेतली आहे. पण बांधकाम विभागाचे (PWD Department) अधिकारी आणि या कामाचे ठेकेदार मात्र बिनधास्त आहेत. जणू काही त्यांना लोकांच्या जिवाचे काहीच देणेघेणे नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संबंधाने संपर्क केला असता ते कॉल रिसीव्ह करीत नाही, असे सरपंच राऊत यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या या प्रकाराने त्रस्त झालेले सरपंच छोटू राऊत यांना एक भन्नाट कल्पना सुटली आणि ती त्यांनी लगेच राबवलीसुद्धा. त्यांनी जाहिरात देऊन जाहीर आवाहन केले. त्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना उद्देशून लिहिले की, अधिकाऱ्यांनी पाटण ते बोरी या रस्त्यावरून सहकुटुंब प्रवास करावा आणि प्रवासादरम्यान त्यांना वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कुठलाही त्रास जाणवला नाही, तर तसे कळवावे. जेवढेही अधिकारी हे आवाहन स्वीकारतील, त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

छोटू राऊत यांनी वृत्तपत्रात दिलेली ही जाहिरात जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे. आता या रस्त्याचे काहीतरी बरेवाईट होईल, अशी आशा लोकांना आहे. वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये राऊत म्हणतात, ‘सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झरी जामणी तालुक्यातील पाटण ते बोरी या रस्त्याचे काम अतिशय धरसोड पद्धतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत आहे आणि रस्ते अपघाताची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर ते भ्रमणध्वनी उचलण्याचेही सौजन्य दाखवीत नाहीत. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र कंत्राटदार कंपनी आणि अधिकाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.

<div class="paragraphs"><p>Hitesh - Chotu Raut yavatmal</p></div>
सरपंच छोटू राऊत यांनी अहेरअल्लीला दिला एक दिवसाचा ग्रामसेवक…

धरसोड वृत्तीमुळे पाटण ते बोरी रस्त्याचे काम पूर्णत्वास का जात नाही, हे कळायला मार्ग नाही. तरी देखील संबंधित कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी एकदा सहकुटुंब या रस्त्यावरून प्रवास करून बघावाच आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांना कसलाही त्रास जाणवला नाही, तर तसे कळवावे. त्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येईल.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com