
Nitin Gadkari News: केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्यानं एकच खळबळ उडाली होती. नागपुरातील खामला चौकातील कार्यालयात सकाळी ११.३० वाजता दोन कॉल आणि १२ वाजताच्या सुमारास एक कॉल करून दाऊद इब्राहिम याच्या नावानं धमकी देण्यात आली होती. तसेच १०० कोटी रुपयांची धमकी देणाऱ्यानं मागणी केल्याचीही माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे.
भाजप नेते व केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचं नाव जयेश पुजारी आहे. तो हत्ये प्रकरणी बेळगाव तुरुंगात भोगत आहे. शिवाय त्यानं जेलमधूनच अशा पद्धतीनं अनेकवेळा या अगोदरही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडं नियमबाह्य पद्धतीनं असलेल्या फोनच्या माध्यमातून त्यानं हे कॉल केल्याचं समोर आलं आहे.यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेल्याचं समोर आलं आहे.
खामला येथील ऑरेंज सीटी हॉस्पिटलसमोर नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. आज सकाळी कार्यालयात त्यांचे अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना कॉल आला. या कॉलवरून दाऊद इब्राहिम (Daud Ibrhahim)कडून बोलत असून १०० कोटी रुपये न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवानिशी मारण्यात येईल असे सांगण्यात आले. जीव वाचवायचा असल्यास तत्काळ पैशांची व्यवस्था करावी असेही सांगण्यात आले.
कर्नाटक राज्यातील बेळगावमधून मंत्री गडकरी यांना १०० कोटींची खंडणी मागत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा फोन आला होता. त्यामुळे या धमकी प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवली. हत्ये प्रकरणी बेळगाव तुरुंगात असलेल्या जयेश पुजारीनं जेलमधूनच गडकरी यांच्या कार्यालयात फोन करत जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता आरोपीला अटक करण्यासाठी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक बेळगावला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.