
अकोला : शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुखही सहभागी झाले आहेत. गुजरातमधील सुरत येथे दाखल झाल्यानंतर आमदार देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तेथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Nitin Deshmukh News in Marathi)
शिवसेनेतील वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर काल सोमवारी ‘नॉट रिचेबल’ होत थेट सुरत गाठले. रात्री उशिरा शिंदे यांची नाराजी उघड झाली. डझनभर आमदार घेवून शिंदे थेट गुजरातमध्ये (Gujrat) दाखल झाले होते. त्यात विदर्भातील (Vidarbha) आमदारांचाही समावेश होता, अशी माहिती होती. या आमदारांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हेसुद्धा होते.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत असलेले आमदार नितीन देशमुख यांना आज पहाटे चार वाजता छातीत दुखू लागल्याने त्यांना सुरतमधील सरकारी रुग्णालयात कक्ष क्रमांक १५ मध्ये दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. रुग्णालयात पोलिस बंदोबस्त असून, तेथे माध्यमांसह कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर काही वेळातच आमदार नितीन देशमुख हे ‘नॉट रिचेबल’ झाले होते. सध्याही त्यांचा फोन बंद असून, अकोल्यातील पदाधिकारी व त्यांचे कुटुंबिय आमदार नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आमदार नितीन देशमुख हे सोमवारी दुपारपासून कोण्याचीही संपर्कात नाही. मुंबईत आमदार निवासात असताना त्यांच्यासोबत शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर ते कुठे आहेत, याची माहिती नव्हती. नंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे कळले. त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- गोपाल दातकर, जिल्हा प्रमुख, शिवसेना, अकोला
आमदार देशमुखांची भाजपशी जवळीक..
आमदार नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या आशीर्वादामुळेच निवडून आले होते, हे सर्वश्रुत आहे. त्यांची सुरुवातीपासूनच भाजपशी जवळीक राहिली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात ते निवडून आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबतच बसावे लागले होते. त्यामुळे इतर शिवसेना आमदारांसोबतच त्यांची होणारी घुसमट त्यांनी अनेक वेळा खासगीत बोलूनही दाखविली होती.
यापूर्वीही अकोल्याने अनुभवले शिवसेनेचे बंड..
शिवसेनेत यापूर्वी झालेल्या बंडात अकोल्यातील आमदारांचा सहभाग होता. मातोश्रीच्या विरोधात जाऊन छगन भुजबळ यांनी बंड पुकारले होते, त्यावेळी अकोल्यातील माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, जगन्नाथ ढोणे व बुलडाण्यातील राजेंद्र गोळे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडेचेही बंड..
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे हे १९९७ -९८ मध्ये नारायण राणे मुख्यमंत्री असताना शिवसेनेतून बंड करीत बाहेर पडले होते. त्यावेळा गणेश नाईक, सुरेश नवले यांच्यासोबत सरकारच्या विरोधात गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये गुलाबराव गावंडे यांचा सहभाग होता. नंतर हे बंड क्षमले व गुलाबराव गावंडे पुन्हा शिवसेनेत आले. अकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ हातावर बांधली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.