
Nagpur Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली. नागपुरात प्रशांत पवार यांना प्रदेश प्रवक्ते तर बाबा गुजर यांना नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष करण्यात आले. तेव्हापासून शहर अध्यक्षपदाचा तिढा सुटला नव्हता. तो आता सुटला आहे. (The impasse over the executive has been broken by these appointments)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षपदी प्रशांत पवार तर कार्याध्यक्षपदी श्रीकांत शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. सुमारे दोन महिन्यांपासून कार्यकारिणीवरून निर्माण झालेली कोंडी या नियुक्त्यांमुळे फुटली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र प्रदान केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुमारे चाळीस आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तत्काळ प्रशांत पवार यांची प्रदेश प्रवक्ता तर बाबा गुजर यांची ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
त्यानंतर सुमारे दोन महिन्यांपासून कार्यकारिणीचा विस्तार होत नसल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. अनेक कार्यकर्ते दोन्ही पक्षांच्या कुंपणावर बसले होते. काहींनी पदाची अट घातली होती. त्यामुळे आणखीच घोळ निर्माण होऊ लागला होता. प्रफुल्ल पटेल यांनी प्रशांत पवार यांची शहराध्यक्षपदी निवड करून कार्यकारिणीच्या विस्ताराचा मार्ग मोकळा केला आहे.
पवार यांची आंदोलक नेता म्हणून ओळख आहे. मेट्रो रिजन, मेट्रो रेल्वेसारखे अनेक ज्वलंत विषय त्यांनी हाताळले आहेत. ‘जय जवान जय किसान’ संघटनेच्या माध्यमातूनही ते वेळोवेळी आंदोलन करीत असतात. पक्षाला शहरात उभारी देण्यासाठी पवार यांच्या आक्रमक स्वभावाचा फायदा होणार आहे. त्यांना अभ्यासू व युवा नेता म्हणून अल्पावधीतच ओळख निर्माण करणारे श्रीकांत शिवणकर यांची कार्याध्यक्ष म्हणून साथ लाभणार आहे.
अहीरकर प्रदेश उपाध्यक्ष..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रदेश उपाध्यक्षपदी अनिल अहीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असतानासुद्धा ते उपाध्यक्षच होते. त्यापूर्वी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अजित पवार (Ajit Pawar) गट बाहेर पडल्यानंतर अहीरकर यांनी पक्ष व चिन्ह ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासोबत जाऊ, अशी भूमिका जाहीर केली होती. तेव्हापासून ते तटस्थच होते. अहीरकर अजित पवार गटात सहभागी झाल्याने काही ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.