
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बुलडाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्यावर तिघांनी शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे बुलडाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हल्ल्यानंतर तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एकाला नागरिकांनी पकडत चांगलाच चोप दिला. तिघांपैकी हा एक हल्लेखोर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. बावस्कर यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास बुलडाणा (Buldana) शहरातील जयस्तंभ चौकात बावस्कर उभे असताना तोंडाला रुमाल बांधलेले तीन इसम चौकात आले. त्यांच्या हाती लोखंडी रॉड होते. काही कळण्यापूर्वीच या तिघांनी बावस्करांवर जबर हल्ला चढवला. यात बावस्कर यांना दुखापत झाली. हल्ला करण्यासाठी आपल्याकडे तिघेही धावत येत असल्याचे दिसल्यामुळे बावस्कर सावध झाले होते. त्यामुळे बावस्कर यांनी त्यापैकी एकाचा रॉड पकडत त्याला जमिनीवर पाडले.
हल्लेखोर व बावस्कर यांच्यात झटापट व आरडाओरड झाल्याने चौकात असलेले नागरिक घटनास्थळाकडे धावले. नागरिकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांपैकी दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. नागरिकांनी एका हल्लेखोराला पकडत चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच जवळच असलेले शहर पोलिस (Police) जयस्तंभ चौकात दाखल झाले. त्यांनी एका हल्लेखोरास ताब्यात घेतले. पकडण्यात आलेला हल्लेखोर जालना येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
बावस्कर यांनी रात्री उशिरा यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू केला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बावस्कर यांच्यावर हल्ला कशामुळे झाला, हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे. या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील संताप वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेते रात्री उशिरापर्यंत बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. हल्लेखोरांना शोधून काढण्याची मागणी या नेत्यांनी पोलिसांकडे केली. बावस्कर यांच्यावरील हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे, याबद्दल मात्र सर्वच नेते मौन बाळगून होते.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.