
नागपूर ः मुख्यमंत्र्यांची सभा काल औरंगाबाद येथे झाली. या सभेकडून महाराष्ट्रातल्या जनतेला, आम्हाला ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सभा घेतात, बेरोजगारी, शेतकरी, विजेता तुटवडा आदी सामान्य लोकांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत, तर केवळ विरोधकांना टोमणे मारण्याचे काम करतात. विरोधक काय म्हणतात, यावरच त्यांचे भाष्य असते. राज्याच्या विकासाचा एक तरी मुद्दा ते मांडतात का, असा प्रश्न करीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) काल औरंगाबाद येथे केलेल्या भाषणात राणा दांपत्याला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचे आव्हान दिले होते. त्यावर नवनीत राणा (MP Navnit Rana) यांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले मात्र, आधी उद्धव ठाकरे मातोश्री वर हनुमान चालिसा कधी वाचणार? औरंगाबादचं (Aurangabad) नाव संभाजी नगर केव्हा करणार? तेथील पाणी प्रश्न केव्हा सोडवणार आदी प्रश्न केले. या प्रश्नांची उत्तरे ज्या दिवशी मिळतील, त्याच दिवशी आम्ही काश्मीरमध्ये जाण्याची तारीख जाहीर करू, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून खासदार राणा म्हणाल्या, मी आणि आमदार रवी राणा काश्मीरमध्ये जाण्यासाठी घाबरत नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठीही आम्ही गेलो होतो. तेव्हा काय घडले, हे संपूर्ण देशाने बघितले. म्हणून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचे आव्हान आहे की, त्यांनी आधी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी. त्यानंतर आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू, म्हणजेच काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा पठण करू.
आमदार रवी राणा आणि मी, आम्ही मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा वाचण्याची विनंती केली होती. त्यावरून त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किती गदारोळ उभा केला होता, हे सर्वांनी बघितलेच आहे. आमच्या देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पण औवैसी औरंगाबादमध्ये येतात, औरंगजेबाच्या कबरीवर हार, फुल चढवतात. त्याच्यावर गुन्हे दाखल करणे तर दूरच, पण मुख्यमंत्री ब्र शब्द देखील बोलत नाहीत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काय काय प्रयत्न केले, हे देखील सांगत नाहीत, असे म्हणत त्यांच्या सभा काय केवळ विरोधकांच्या बोलण्यावर भाष्य करण्यासाठी असतात काय, असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.