राष्ट्रवादीने साथ सोडली; भाजपच्या मदतीने नाना पटोलेंनी बसवला काँग्रेसचा अध्यक्ष

Nana Patole : चक्क काँग्रेस अन् भाजपची युती अन् नाना पटोले ठरले हिरो
राष्ट्रवादीने साथ सोडली; भाजपच्या मदतीने नाना पटोलेंनी बसवला काँग्रेसचा अध्यक्ष
Nana Patolesarkarnama

भंडारा : भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) साथ सोडल्यानंतर काँग्रेसने (Congress) भाजपमधील (BJP) फुटीर गटाला सोबत घेत आपली सत्ता स्थापन केली आहे. यानुसार अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपचे संदीप टाले विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचा नैसर्गिक मित्र राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. यातुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक प्रकारे भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा उचलला असल्याचे बोलले जात आहे.

(Bhandara Jilha Parishad News)

आधी कोरोना नंतर ओबीसी आरक्षणाचा तिढा अशा सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत तब्बल २ वर्षांनंतर गोंदिया जिल्हा परिषदेची (ZP) निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. त्यानंतरच १५ दिवसांत अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने अध्यक्ष व सभापती पदासाठी निघालेले पूर्वीचेच आरक्षण कायम ठेवायचे की नव्याने आरक्षण काढायचे, यावर जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाचे मार्गदर्शन मागविले होते. मात्र, तीन महिने उलटल्यानंतरही ग्रामविकास विभागाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

Nana Patole
प्रफुल्ल पटेलांचा नाना पटोलेंना धक्का! भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन

परिणामी निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांनी ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर २२ एप्रिल रोजी न्यायालयाने शासन आणि निवडणूक विभागाला ७ जून पूर्वी अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करा, असे मौखिक आदेश दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लगबगीने जि. प. अध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिसूचना जारी केली. त्यानंतर आज पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बाजू ठेवत काँग्रेस आणि भाजपने एकत्र सत्ता स्थापन केली आहे. तर काँग्रेसचा परंपरागत आणि नैसर्गिक मित्र राष्ट्रवादीवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.

Nana Patole
"राज्यात दंगली घडविण्याचा काहींचा कट" : जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

भंडारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडल्यावर भाजपमध्ये नाराज असलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला मदतीचा हात दिला. याच मित्राच्या सहकार्याने नाना पटोले जिल्हा परिषदेत येत्या १० मे रोजी सत्ता स्थापन करणार, असे जवळपास निश्‍चित झाले होते. त्यानुसार वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्य असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या ७ सदस्यांनी १३ सदस्यीय राष्ट्रवादीसोबत राहणं पसंत केले. त्यांना बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष २ अशा सदस्यांची साथ मिळाली. भाजप-काँग्रेसची युती होवून अन् सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादीच्या वाट्याला विरोधी बाक आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.