दादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर नाना खूष !

विकासाच्या पंचसूत्रीतून राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
Nana Patole and Ajit Pawar
Nana Patole and Ajit PawarSarkarnama

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा आहे. विकासाच्या पंचसूत्रीतून राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. एकंदरीतच दादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर नाना (Nana Patole) खूष दिसले.

महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) आजच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या ३४ हजार शेतक-यांना ९६४ कोटींची कर्जमाफीही देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी इतर पर्यायांचा विचारही करण्यावर भर दिलेला आहे. महिला शेतकऱ्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी येत्या ३ वर्षात १ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शेततळ्यांसाठीचे ५० हजार रुपयांचे अनुदान आता ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये स्त्री रुग्णालये उभारण्यात येणार असून नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार आहेत. पुणे येथे इंद्रायणी मेडिसीटी उभारली जाणार असून ३०० टेलीमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार आहेत. कर्करोग कर्करोग निदान वाहनांची सुविधा शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्‍सींग मशीन सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच स्टार्टअपसाठी १०० कोटी रुपये निधी प्रस्तावित केला आहे.

Nana Patole and Ajit Pawar
नाना पटोले निंदा प्रस्ताव आणून राज्यपाल कोश्‍यारींची हकालपट्टी करणार...

बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी २५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांवरून ७०० कोटी रुपये केली आहे. छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी सईबाई, श्री संत जगनाडे महाराज या महापुरुषांच्या स्मारकांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सीएनजीवरील कर १३.५ टक्क्यांवरून कमी करून ३ टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात सीएनजी स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सोबतच सौर ऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन ही उभारण्यात येणार आहेत. पोलीस भरतीपूर्व तीन महिन्यांचे प्रशिक्षण देणे तसेच ३ लाख ३० हजार नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवून बेरोजगारांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालयासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून दोन वर्ष अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यातच गेला. राज्याच्या प्रत्येक विभागाचा विचार करून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. कोणताही घटक वंचित राहणार नाही याची खबरदारी या अर्थसंकल्पात घेण्यात आलेली आहे. विकासाची पंचसूत्री घेऊन आजचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरेल. महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाला न्याय देणारे असून या सर्व घटकांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत आहे, असे पटोले म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com