Nagpur:नागपूर ‘शिक्षक’ निवडणूक: भाजपमधून बंडखोरीची शक्यता, ‘भारती’ला कॉंग्रेसची प्रतीक्षा !

नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घंटी वाजली आहे. यामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, शिक्षक परिषद यांच्यासह भाजप आणि कॉंग्रेसने आपले उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे.
Nagpur
Nagpur Sarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घंटी वाजली आहे. यामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, शिक्षक परिषद यांच्यासह भाजप आणि कॉंग्रेसने आपले उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे यावेळी या निवडणुकीत वेगळी रंगत राहण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून चंद्रपूरचे (Chandrapur) श्री आडबले, शिक्षक भारती राजेंद्र झाडे, भाजप (BJP) आघाडीकडून कल्पना पांडे, कॉंग्रेसकडून (Congress) डॉ. बबनराव तायवाडे आणि शिक्षक परिषदेकडून नागो गाणार रिंगणात राहण्याची शक्यता आहे. सद्यःस्थिती नागो गाणार हे भाजप समर्थीत आमदार आहेत. भाजप शिक्षक परिषदेसोबत राहिल्यास गाणार यांचा विजय पक्का मानला जातो. नागो गाणार तसेही स्ट्रॉंग उमेदवार आहेत. पण भाजपने स्वतंत्र उमेदवार दिल्यास त्यांच्या अडचणी वाढू शकतात. पण भाजप यावेळी परिषदेला पाठिंबा देणार नाही, असे सांगितले जात आहे.

तिकडे नागपूर पदवीधर मतदारसंघात शिक्षक भारतीने कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी अभिजित आमदार पदवीधर मतदार संघातून निवडून आले. शिक्षक मतदारसंघात मदत करण्याच्या अटीवर शिक्षक भारतीने कॉंग्रेसला मदत केली होती. आता त्यांना कॉंग्रेसकडून अपेक्षा आहे. शिक्षक भारतीला कॉंग्रेसची मदत मिळाल्यास राजेंद्र झाडे यांचे पारडे जड होणार आहे. पण कॉंग्रेसने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिक्षक भारतीच्या गोटात चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. आता जर कॉंग्रेसने मदत केली नाही, तर पुढील पदवीधर मतदारसंघात त्यांच्याशी पुन्हा आमना-सामना होईल, तेव्हा बघून घेऊ, अशी भूमिका शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी घेतली आहे.

भाजपमधून कनाटे यांचे बंडाचे निशाण..

भाजपमध्ये सुमारे अर्धा डझन इच्छुक असल्याने उमेदवार निवडताना भाजपची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे बंडाचीही शक्यता वर्तविली जात आहे. भाजपतर्फे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. माजी आमदार अनिल सोले यांच्यावर पदवीधरमध्ये अन्याय झाल्याने त्याची परतफेड शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमातून करावी, अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांची आहे. दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. आमदार नागोराव गाणार यांचे नेहमीप्रमाणे वेट अँड वॉच सुरू आहे. कुठल्याच नावावर एकमत होणार नाही असा त्यांच्या कट्टर समर्थकांचा दावा आहे.

नेत्यांच्याच मागे किती दिवस फिरणार, असे सांगून राजू कनाटे यांनी आपण उमेदवारी दाखल करणार असल्याचे सर्वांनाच स्पष्टपणे सांगितले. त्यांनी आपला एक प्रचार दौरा आटोपलासुद्धा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार अनिल सोले यांनाही त्यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट पूर्वसूचना त्यांनी दिली आहे. माजी महापौर आणि विद्यापीठाच्या राजकारणात सध्या प्रचंड सक्रिय असलेल्या कल्पना पांडे यासुद्धा मोर्चेबांधणी करीत आहेत. योगेश बन यांचा नेहमीप्रमाणे दावा अद्यापही कायमच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली असल्याने त्यांची मर्जी उमेदवारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धेत असलेली अनेक बडी नावे कापल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता राज्यात राजकारणात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालायचे नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची अडचण होऊ शकते.

पदवीधरची पुनरावृत्ती नको..

पदवीधरची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता भाजप सावध भूमिकेत आहे. भाजप समर्थक आमदार नागोराव गाणार दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहे. आपसातील मतभेदांमुळे हा मतदारसंघसुद्धा हातून जाऊ नये, याची पुरेपूर काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवार देताना गटबाजी टाळण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.

Nagpur
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com