
Chandrapur Political News : मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, ओबीसींच्या विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करावी आणि स्वाध्याय योजनेचा लाभ या मागण्यांसाठी चंद्रपुरात गेल्या आठ दिवसांपासून रवींद्र टोंगे यांनी आठ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. (Requested withdrawal of hunger strike)
काल (ता. १७) टोंगे यांना समर्थन देण्यासाठी चंद्रपुरात ओबीसींच्या विविध संघटनांनी महामोर्चा काढला. यानंतर आज (ता. १८) जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अन्नत्याग करणाऱ्या रवींद्र टोंगे यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. या वेळी त्यांनी टोंगे यांच्याशी चर्चा केली व आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लवकरच होस्टेल सुरू करण्यात येतील व स्वाधार योजनेची अंमलबजावणी केली जाईल, अशा दोन मागण्या मुनगंटीवार यांनी मान्य केल्या.
आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. ओबीसीच्या (OBC) कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी चंद्रपूरच्या (Chandrapur) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. टोंगे यांच्या आंदोलनाची सत्ताधाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांत नाराजीचा सूर आहे.
टोंगे यांना समर्थन देण्यासोबत मराठ्यांना कुठल्याही स्थितीत ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही (Maharashtra) जातीनिहाय जनगणना करावी, यांसह ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांकरिता काल ओबीसींच्या विविध संघटनांनी चंद्रपुरात महामोर्चा काढला.
एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली. मोठ मोठे नेते, दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली. पण रवींद्र टोंगेंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतली नाही. यावरून ओबीसींबद्दल सरकार किती उदासीन आहे, हे स्पष्ट झाले. दरम्यान, आंदोलनाच्या तब्बल आठ दिवसांनंतर आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिली.
अन्नत्याग आंदोलनामुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. शेवटी जीवन महत्त्वाचे आहे. चंद्रपूर येथे ओबीसी बांधवांकरिता असलेले हाॅस्टेल सुरू करणे व नवीन हॉस्टेलचे बांधकाम करण्याकरिता आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
स्वाधार योजनेपासून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी वंचित राहणार नसल्याचेही सांगितले. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे टोंगे यांनी मुनगंटीवार यांना सांगितले. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे टोंगेंनी ठणकावून सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.