Eknath Shinde : मुख्यमंत्री महोदय, नरकात जाणाऱ्या ‘त्या’ रस्त्यावरून एकदा प्रवास कराच !

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जेव्हा पहिल्यांदा गडचिरोलीत आले होते, तेव्हा पावसाळा होता आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर तेथे जाऊ शकत नव्हते. त्यावेळी मंत्रिद्वय रस्ते मार्गाने (नाइलाजाने) गडचिरोलीला (Gadchiroli) गेले होते.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

(Chief Minister o Maharashta Eknath Shinde) नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्रीही होते. तेव्हा ते नियमित गडचिरोलीत येत होते. आता भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केल्यानंतरही ते दोन वेळा गडचिरोलीत आले. पण त्यांना अद्याप जिल्ह्यातील रस्ते दिसले नाहीत का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील नागरिकांनी विचारला आहे.

आष्टी ते अहेरी ५० ते ५५ किलोमीटरचे अंतर आहे. येवढे अंतर कापण्यासाठी सामान्यपणे एक तास किंवा फारच फार तर दीड तास लागायला पाहिजे. पण सद्यःस्थितीत हे अंतर कापण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात आणि प्रवाससुद्धा जीवघेणा आहे. कोणत्या खड्यातून केव्हा गाडी उसळेल आणि अपघात होईल, याचा नेम नाही. त्यामुळे अक्षरशः जीव मुठीत घेऊन लोकांना प्रवास करावा लागतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जेव्हा पहिल्यांदा गडचिरोलीत आले होते, तेव्हा पावसाळा होता आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर तेथे जाऊ शकत नव्हते. त्यावेळी मंत्रिद्वय रस्ते मार्गाने (नाइलाजाने) गडचिरोलीला (Gadchiroli) गेले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले होते. त्यानंतरही अवस्था सुधारली नाही. त्यामुळे 'मुख्यमंत्री महोदय नरकात जाणाऱ्या ‘त्या’ रस्त्यावरून एकदा प्रवास कराच !', असे संतप्त लोक बोलत आहेत.

युवकाचे नितीन गडकरींना साकडे..

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ते आष्टी आणि त्यापुढे जिमलगट्टा, सिरोंचा आणि आसरअल्लीपर्यंत हा रस्ता जीवघेणा झालेला आहे. लोकांनी मागणी करण्याचा विषयच आता संपला आहे. रस्त्यांच्या अशा अवस्थेमुळे अनेक गावांमध्ये एसटी बसेस जात नाहीत. लोकांना चंद्रपूर आणि नागपूरला जाण्याची बव्हंशी मार्ग बंद झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेचे काय वर्णन करावे. स्थिती येवढी खराब आहे की, निरज दोंतूलवार हा युवक आपल्या माता-पित्यांना नागपूरला दवाखान्यात आणू शकला नाही. असे अनेक ‘निरज’ गडचिरोली जिल्ह्यात असतील. अखेरीस हतबल झालेल्या या युवकाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) ट्विट करून साद घातली. ट्विटमध्ये निरज म्हणतो, ‘साहेब, आपणच काही तरी करू शकता… गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ते आष्टी हा रस्ता नरकात जाणारा रस्ता म्हणून ओडखला जात आहे. या भागातील नागरिकांची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. मुले शाळेत, रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाही आहेत. आपणच लक्ष द्यावे ही विनंती.’

Eknath Shinde
Shinde : विस्ताराबद्दल फडणवीसांनी सांगितले, पण एकनाथ शिंदे ठामपणे बोलले नाहीत !

११ टिप्पर जाळले होते..

खासकरून सिरोंचा रस्त्याच्या अवस्थेवरून मुख्यमंत्री संतापले होते. त्यानंतरही काहीच सुधारणा झाली नाही. पावसाळ्यात दीड महिना विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नव्हते. रुग्णालयात नेताना दोन रुग्ण दगावले (हे माहिती असलेले आहेत) अशी अनेक प्रकरणे दडपण्यात आल्याचीही माहिती एका नागरिकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. गेल्या महिन्यात एक दाम्पत्य दुचाकीने जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यात जागिच मरण पावले. तेव्हा लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी एक-एक करत सुरजागड प्रकल्पाचे तब्बल ११ टिप्पर जाळले होते. येवढे होऊनही मुख्यमंत्री आणि त्यांच्या यंत्रणेला गडचिरोलीतील रस्त्यांच्या अवस्थेची दखल घ्यावीशी वाटली नाही, हे खेदजनक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in