खासदार बोंडे म्हणाले, संजय राऊतांबद्दल काहीही वाईट बोलू नका...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही, असे खासदार बोंडे (Anil Bonde) म्हणाले.
MP Anil Bonde and MP Sanjay Raut
MP Anil Bonde and MP Sanjay RautSarkarnama

नागपूर : काल पनवेलमध्ये भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याला पडलेल्या सर्व प्रश्‍नांची समर्पक उत्तरे दिली आहेत. एकनाथ शिंदे यांनी तर विधानसभेच्या सभागृहात सर्व काही सांगितलं. संघटनेचा प्रमुख आणि त्याचे कार्यकर्ते किंवा आमदार यांच्यातील इमोशनल कनेक्ट जेव्हा तुटतो, तेव्हा या सर्व गोष्टी घडतात, असं फडणवीसांनी सांगितलं. आज घडामोडींवर हे सर्वाधिक महत्वाचं वक्तव्य आहे, असे भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे म्हणाले.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना खासदार बोंडे (MP Anil Bonde) म्हणाले, पैशांपेक्षा स्वतःचा मान सन्मान, स्वतःचं अस्तित्व, मतदारसंघात फिरत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) लोकांची कुरघोडी या सर्व गोष्टींमुळे शिवसेनेतील (Shivsena) लोकांना आपल्या नेतृत्वापासून दूर जाण्याची गरज भासली. सेनेतून बाहेर पडलेली मंडळी आज हे सर्व बोलताहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचाराशी प्रामाणिक राहून गेली अनेक वर्ष शिवसेनेसाठी झटलेल्या लोकांवर ते गेल्यानंतर खालच्या पातळीवर आरोप व्हावे, हे दुर्दैवी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव प्रत्येक जण घेतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रत्येक जण घेतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नावही आज प्रत्येक जण घेतो. बाळासाहेब ही व्यक्ती नसून एक विचार आहे. त्या विचारासाठी हे नाव घेतलं जातंय. मग ते माझे वडील होते, माझ्या रक्ताचे होते, तुम्ही कशाला त्यांचे नाव घेता, असं म्हणून नाही चालत. त्या विचाराचा पूजक जो असेल, तो त्यांचा वारस म्हणून पुढे येऊ शकतो. त्यामुळे रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं नातं अधिक घट्ट असतं. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही, असे खासदार बोंडे म्हणाले.

MP Anil Bonde and MP Sanjay Raut
Rajya Sabha Election Result 2022 : अनिल बोंडे याचं 'ते' विधान खरं ठरलं !

संजय राऊतांना महाराष्‍ट्राचं वातावरण येवढं खराब केलेलं आहे, त्यांच्या काहीही बोलल्याने आता काहीही परिणाम होणार नाही. कारण लोकांना आता त्यांच्या बोलण्याची चीड यायला लागली आहे. त्यामुळे नुकतेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘संजय राऊतांबद्दल काहीही बोलू नका. कारण अप्रत्यक्षपणे ते आपलंच काम करत आहेत. उद्धव ठाकरेही त्यांना थांबवत नाही. त्यामुळे आपण त्यांना थांबवण्याचं काही कारण नाही.’ राऊतांचं काही अंतिम उद्दिष्ट असावं, ते त्यांना साध्य करू द्या. त्यांना काहीही वाईट बोलू नका, असेही खासदार बोंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in