आमदार सुधीर मुनगंटीवारांना पडला प्रश्‍न, मैत्री कधी खुर्ची समोर तुटते…?

श्रीराम आप्पाजी आसेगावकर यांचा पूर्णाकृती पुतळा समाजाला शुद्ध विचारांची दिशा देईल, असे सांगताना माजी अर्थ व नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

पुसद (जि. यवतमाळ) : राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत कार्य करताना सहकार्याची बांधीलकी जपणारे श्रीराम आप्पाजी आसेगावकर यांचा पूर्णाकृती पुतळा समाजाला शुद्ध विचारांची दिशा देईल, असे सांगताना माजी अर्थ व नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले.

मी व माझा परिवार ही भावना आज वाढत आहे. प्रत्येकाच्या आशा-आकांक्षा वृद्धिगंत होत आहेत. दोहन ऐवजी शोषण होत आहे. कुटुंब, समाजातील एकमेकांना मदत करण्याची भावना नाहीशी होत आहे. अशा स्थितीत श्रीराम आप्पाजी आसेगावकर यांचा पूर्णाकृती पुतळा समाजाला शुद्ध विचारांची दिशा देईल, असे विचार आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री मनोहर नाईक (Manohar Naik) प्रकृतीच्या कारणावरून उपस्थित नव्हते. मात्र त्यांचा संदेश डॉ. उत्तम रुद्रवार यांनी वाचून दाखविला. सत्ता असो वा नसो वसंतराव नाईक यांच्यासोबत अप्पाजींनी विश्वासाने खरी मैत्री जपली, हे या संदेशातील मुख्य सूत्र पकडत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सध्याच्या राजकीय (Politics) परिस्थितीवर टीकाटिप्पणी केली. 'मैत्री कधी खुर्चीसमोर तुटते का, हे सांगणे आज कठीण आहे', अशा शब्दात त्यांनी आजच्या राजकीय बदलावर नेमके बोट ठेवले. आप्पाजींनी विचारांच्या शुद्धतेची हमी दिली, त्याचीच आजच्या राजकारणाला खरी गरज आहे, असेही ते म्हणाले.

पुसद परिसरातील सहकारमहर्षी दिवंगत श्रीराम आप्पाजी आसेगावकर यांच्या श्रीरामपुरात कार्ला रोडवर उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मदन येरावार होते. यावेळी व्यासपीठावर आमदार समीर कुणावार, आमदार इंद्रनील नाईक, आमदार नामदेव ससाने, माजी मंत्री डॉ. एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, कृषिभूषण दीपक आसेगावकर, विजया आसेगावकर, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, ॲड. आशिष देशमुख, शरद मैंद, राजन मुखरे, डॉ. आनंद मुखरे, धनंजय तांबेकर, लक्ष्मणदादा जाधव, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, सरपंच आशिष काळबांडे यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व श्रीराम ऑक्सी-पार्कचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या ऑक्सी-पार्कमधील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व अप्पाजी यांच्यासोबतच्या बोलक्या स्मृतीशिल्पाने काही क्षण सर्वांच्याच नजरा खिळविल्या. श्रीराम आप्पाजी यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या नीटनेटक्या, सर्वांगसुंदर कार्यक्रमाची आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, पुसदच्या विकासात नाईक परिवाराचे मोठे आहे. या योगदान कार्याला सहकार व नियोजनातून आप्पाजींनी आधार दिला. त्यांनी सूतगिरणीतून शेतकरी व कामगारांचे हित जोपासले. त्यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांनी आर्य वैश्य समाजात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला.

Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार म्हणाले, सत्ता मे जो आये है, जरा याद करो इनकी बेईमानी…

प्रास्ताविक शब्दप्रभू डॉ. उत्तम रुद्रवार यांनी केले. त्यांनी अप्पाजींच्या कर्तृत्वाचा मळा सुंदर शब्दात गुंफला. आमदार इंद्रनील नाईक यांनी नाईक व आसेगावकर परिवार यांच्यातील सहकार, सलोखा व विश्वासाचे अनोखे अनुबंध प्रामाणिक शब्दांतून उलगडले. आमदार समीर कुणावार म्हणाले, त्यांचे कार्य-कर्तृत्व अनुकरणीय आहे. सहकार, शिक्षण, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. आर्य वैश्य समाजातील वधू वर परिचय मेळावे, हा अप्पाजींनी दिलेला मंत्र आहे. केवळ स्वतःसाठी नव्हे तर लोकांसाठी काम करा, हा संदेश त्यांनी जीवन कार्यातून दिला आहे.

अप्पाजींच्या कार्याचे मोठेपण शब्दात गुंफताना सामाजिक क्षेत्रात आसेगावकर हे 'ब्रँड नेम' असल्याचे आमदार मदन येरावार म्हणाले. नीटनेटकेपणा, मोजके बोलणे व त्यातून निर्माण होणारी शिस्त, पांढरेशुभ्र कडक कपडे व वागण्यातून पडलेली छाप व सोबत कर्तृत्वाची उंची ही अप्पाजींच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य़े त्यांनी खुसखुशीत शैलीत सांगितली. दीपक आसेगावकर यांच्या कार्यकुशलतेची त्यांनी प्रशंसा केली. सुरुवातीला प्रा. चंद्रकिरण घाटे यांनी वंदन गीत सादर केले. सूत्रसंचालन मनीष अनंतवार यांनी केले तर दीपक आसेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com