Parinay Fuke : आमदार परिणय फुके म्हणाले, त्या दिवसांत मी तेथील भयावह स्थिती बघितली…

भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आमदार डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी सभागृहाला दिली.
MLC Dr. Parinay Fuke
MLC Dr. Parinay FukeSarkarnama

नागपूर : जुलै महिन्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. विशेषकरून भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) या दोन जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात ८ आणि १५ तारखेला प्रचंड पाऊस पडला आणि त्यानंतर महापुराची स्थिती उद्भवली. वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना मोठा पूर आला. त्यामध्ये भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी सभागृहाला दिली.

अतिवृष्टीसंदर्भातला प्रस्तावावर बोलताना डॉ. फुके म्हणाले, सरासरी ६० मिमी पाऊस आमच्या भागात पडतो. पण ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस एकट्या मोहाडी तालुक्यात पडला. मोहाडी तालुक्यातील आंधळगावात मोठे नुकसान झाले. हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर ज्या सुट्या आल्या, त्या दिवसांत २७ ते २८ गावांमध्ये मी स्वतः फिरून आलो. तेथे शेतमाल आणि शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. याशिवाय घरांचेही मोठे नुकसान झालेले आहे. जनावरे वाहून गेली, काही शेतांमध्येच मृत्युमुखी पडली. मोठी भयावह स्थिती आहे.

भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तूर, धान, सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झालेले आहे. ज्या भागांतील घरे पडली, त्या लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलविले आहे. तुमसर तालुक्यातील धानेगावमध्ये वनविभागाने दोन तलाव बांधले होते. ते तलाव फुटले आणि गावात पाणी शिरले. रात्री १२ वाजता तेथील घरे पाण्याखाली आली. तेव्हा ताबडतोब आमचे लोक आणि महसूल विभागाच्या लोकांनी त्यांना तेथून बाहेर काढले आणि वनविभागाच्या जागेवर तात्पुरते तंबू उभे करून दिले.

जेथे तंबू उभे केले, ती जागा वनविभागाची आहे. आता ते लोक ती जागा रिकामी करून मागताहेत. सद्यःस्थिती बघता सहा महिने ते १ वर्ष वनविभागाने त्या लोकांना तेथे राहू दिले पाहिजे. कारण तेथील आकडेवारी बघितली असता, तेथील अंशतः व पूर्णता यामध्ये फक्त २ किंवा ३ टक्के घरांनाच पूर्णतः बाधित दाखवण्यात आले आहे. मातीच्या घराची एक भिंत पडली की त्या घराला अंशतः बाधित दाखवले जाते आणि त्याला आपण ५००० रुपये मदत देतो. पण मातीचे घर असल्यामुळे ते ओल पकडतं आणि ८ ते १५ दिवसांमध्ये पूर्णतः कोसळतं. त्यामुळे अशा घरांसाठी आपण पूर्ण १०० टक्के मदत दिली पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. फुके यांनी केली.

MLC Dr. Parinay Fuke
आमदार परिणय फुके संतापले; म्हणाले विद्यार्थ्यांच्या जिवाशी हा काय खेळ चालवलाय ?

पूरपरिस्थितीमुळे काही तालुक्यांतील रस्ते अजूनही बंद आहेत. यामध्ये मोहाडी तालुक्यातील विटनगाव, डोंगरगाव, कऱ्हाळगाव, बडेगाव आदी रस्ते बंद आहेत. पुलांचेही नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आदेश देऊन झालेली नुकसान भरपाई दिली पाहिजे. भंडारा जिल्ह्यात २६ गावं नदीकाठी आहेत आणि पूर आल्यावर ती पूर्णतः बुडतात. २०२०च्या पुरातसुद्धा भंडाऱ्यातील गावं बुडाली होती. त्यांचे ऐच्छिक पुनर्वसन करावे. जेणेकरून यापुढे त्यांच्यावर अशी वेळ येणार नाही, असे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सभागृहाला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com