
नागपूर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांत सातत्याने वाढच होत आहे. काल रात्री अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे शिंदेंना जाऊन मिळाले. पण आज आमदारांची संख्या एकने कमी होणार असं दिसतंय. त्याला कारणही तसेच आहे.
पहिल्या दिवशी एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेलेले पश्चिम विदर्भाच्या (Vidarbha) अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती खालावली होती. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे काल पहाटे त्यांना सुरतच्या शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना पुन्हा सुरतच्या हॉटेलमध्ये आणण्यात आले. तेथे त्यांनी पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर त्यांना बरे वाटू लागले आणि आज टिम एकनाथ शिंदेंसोबत ते आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले, अशी माहिती देण्यात आली होती.
हे सर्वकाही सुरू असताना आता आमदार नितीन देशमुख परत येणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. दातकर स्वतः त्यांना घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले होते. देशमुख आज दुपारी एकच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल झाले. तेथे येताच त्यांनी खळबळजनक दावा केला. मला हृदयविकाराचा झटका आलेला नव्हता. मी आजारी नव्हतो. मला बळजबरीने डाव्या दंडावर इंजेक्शन टोचण्यात आले. मी उद्धव ठाकरे यांचा सैनिक आहे. मी त्यांच्यासोबतच राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिवसेनेच्या इतर आमदारांप्रमाणे नितीन देशमुखही शिवसेनेत नाराज होते. तसे ते आधीपासून भाजपच्या विचारांनी चालणारे नेते म्हणूनच ओळखले जातात. आमदार नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या आशीर्वादामुळेच निवडून आले होते, हे सर्वश्रुत आहे. त्यांची सुरुवातीपासूनच भाजपशी जवळीक राहिली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात ते निवडून आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबतच बसावे लागले होते. त्यामुळे इतर शिवसेना आमदारांसोबतच त्यांची होणारी घुसमट त्यांनी अनेक वेळा खासगीत बोलूनही दाखविली होती.
आमदार नितीन देशमुख यांना गुजरात पोलिसांनी मारहाण केल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या परत येण्यामागे हे तर कारण नाही ना, याचीही चाचपणी केली जात आहे. संजय राऊत यांनी आपल्या टि्वटमध्ये “आमदार नितीन देशमुख हे सुरतमध्ये भाजपच्या ताब्यात आहेत. त्यांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांनी स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुजरात पोलिस आणि गुंडांनी त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला केला. मुंबईचे गुंडही तेथे आहेत. गुजरातच्या भूमीवर हिंसाचार?, असा आरोप केला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.