आमदार कारेमोरेंची सुटका नाहीच, १९ जानेवारीपर्यंत अंतरिम जामिनावर...

पोलिसांना १९ तारखेला आपली बाजू मांडायची आहे. ती ऐकल्यानंतरच न्यायालय (Court) आपला निर्णय देणार आहे. तोपर्यंत कारेमोरेंना (Raju Karemore) दिलासा मिळणार नाही.
MLA Raju Karemore
MLA Raju KaremoreSarkarnama

भंडारा : मोहाडी- तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे (Raju Caremore) यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन अश्लील शिवीगाळ करीत धिंगाणा घातला होता. त्यासाठी त्यांना रात्रभर तुरुंगातदेखील राहावे लागले होते. त्यांच्या जामीन अर्जावर आज भंडारा सत्र न्यायालयात (Court) सुनावणी झाली. यामध्ये पोलिसांना आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने १९ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.

आमदार कारेमोरेंना आता १९ जानेवारीपर्यंत अंतरिम जामिनावर राहावे लागणार आहे. या चार दिवसांत तयारी करून भंडारा (Bhandara) पोलिसांना १९ तारखेला आपली बाजू मांडायची आहे. ती ऐकल्यानंतरच न्यायालय आपला निर्णय देणार आहे. तोपर्यंत कारेमोरेंना दिलासा मिळणार नाही. आमदार राजू कारेमोरे यांच्याकडून ॲड. राकेश सक्सेना, ॲड. किशोर लांजेवार आणि ॲड. सोनाली अवचट यांनी बाजू मांडली, तर भंडारा पोलिसांकडून सरकारी वकील ॲड. भोले आणि ॲड. टवले यांनी बाजू मांडली.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास आपल्या व्यापारी मित्राला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार कारेमोरेंनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टिका झाली. घटनेच्या तीन दिवसांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत भंडारा पोलिसांनी कलम 353, 354, 294, 504, 506, 143, 147, 149 IPC r/w 135 मुंबई पोलीस कायद्यानुसार मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये घातलेल्या गोंधळ व शिवीगाळ प्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना भंडारा शहर पोलिसांनी 3 जानेवारीला अटक केली होती.

आमदार कारेमोरे यांना मोहाडी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमांमुळे त्यांना मोहाडी कोर्टाने जामीन नाकारत 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र आमदारांच्या वकिलांनी त्याच दिवशी तत्काळ भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनाकरिता अर्ज केला होता. 3 जानेवारीला आमदारांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र जामिनाची सर्टिफाइड कॉपी मिळण्यासाठी उशीर झाल्याने शिवाय भंडारा पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना रात्रीच तुरुंग प्रशासनाच्या सुपूर्द केल्याने 3 जानेवारीची रात्र त्यांना तुरुंगात काढावी लागली होती. तब्बल 12 तास तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर राजू कारेमोरे यांची 4 जानेवारीला सुटका करण्यात आली. त्यांना भंडारा सत्र न्यायालयाने 15 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने आज त्यावर सुनावणी झाली. आता त्यांना १९ जानेवारीपर्यंत पुन्हा वाट बघावी लागणार आहे.

MLA Raju Karemore
पोलिसांना शिवीगाळ केल्यानंतर आमदार कारेमोरे पडले एकाकी…

काय होता वाद ?

दरम्यान, कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे (31 डिसेंबर) रात्री 9 च्या वाजताच्या सुमारास घरून 50 लक्ष रुपयांची रोकड वाहनातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडिकेटर का दाखवला नाही, म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच कारेमोरे हे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांच्या व्यापारी मित्राजवळील 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी पळविली असल्याचा आरोप करीत धिंगाणा घातला. यानंतर त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com