सुरतमध्ये असलेल्या आमदाराच्या पत्नीची ‘मिसिंग’ तक्रार…

शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांचे फोनही बंद असून, यात बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचाही फोन बंद आहे.
सुरतमध्ये असलेल्या आमदाराच्या पत्नीची ‘मिसिंग’ तक्रार…
Nitin Deshmukh and Eknath ShindeSarkarnama

अकोला : जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोला (Akola) येथील सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. आमदार देशमुख यांचा फोन सकाळपासून स्विच ऑफ असल्यामुळे तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषद निवडणूक झाल्यापासून नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांचे फोनही बंद असून, यात बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांचाही फोन बंद आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून नितीन देशमुख विजयी झाले होते. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा मान देशमुख यांना मिळाला होता.

विधान परिषद निवडणुकीनंतर नितीन देशमुखही शिवसेनेच्या संपर्क क्षेत्रातून बाहेर गेलेल्या आमदारांसोबत सुरतला पोहोचले होते. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारनंतर त्यांना पुन्हा एकनाथ शिंदे व इतर शिवसेना आमदार असलेल्या सुरतमधील हॉटेलमध्ये परत आणण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पत्नीचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी आज दुपारी १ वाजतानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये पती आमदार नितीन देशमुख हरविल्याची तक्रार दिली.

Nitin Deshmukh and Eknath Shinde
उपमुख्यमंत्रीपदाच्या ऑफरनंतर एकनाथ शिंदे सुरतमध्ये दाखल !

काय आहे तक्रारीत?

आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत आमदार देशमुख हे १६ जून रोजी रात्री विदर्भ एक्स्प्रेसने मुंबई येथे गेल्याचे नमूद आहे. ते १७ जून रोजी मुंबई येथे पोहोचले. त्यांनी २० जून रोजी सायंकाळी मुंबई येथून अकोला करता निघत असल्याचे पत्नीला फोनवरून सांगितले. पत्नीने सायंकाळी फोन केला. परंतु त्यांचा फोन बंद होता. २१ जून रोजी आमदार देशमुख हे अकोला येथे पोहोचणे अपेक्षित होते, परंतु ते पोहोचले नाही व त्यांचा मोबाइल ही बंद आहे.

त्यांच्या पत्नीने मुंबई येथील मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव गवळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे का, असा दाट संशय पत्नीने दिलेल्या पोलिस तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. पती नितीन देशमुख यांच्याशी संपर्क होत नसल्याने हरवल्याबाबत तक्रार नोंदवत आहे, असेही प्रांजली देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in