अजित पवार आणि वळसे पाटील गडकरींच्या भेटीला, भविष्यातील युतीसाठी तर नाही?

अजित दादा आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नियोजित दौऱ्यात कुठेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीचा उल्लेख नव्हता. नियोजनाप्रमाणे हे नेते गडचिरोली येथे सी-६० जवानांच्या सन्मान कार्यक्रमाला गेले होते.
अजित पवार आणि वळसे पाटील गडकरींच्या भेटीला, भविष्यातील युतीसाठी तर नाही?
Nitin Gadkari, Ajit Pawar and Dilip Walse PatilSarkarnama

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज नागपुरात आहेत. सिव्हिल लाइन्स येथील पोलिस भवनाचे उद्घाटन हा या नेत्यांचा आजचा मुख्य कार्यक्रम होता. पण दरम्यान या दोन्ही नेत्यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, अजित दादा (Ajit Pawar) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या नियोजित दौऱ्यात कुठेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीचा उल्लेख नव्हता. नियोजनाप्रमाणे हे नेते गडचिरोली येथे सी-६० जवानांच्या सन्मान कार्यक्रमाला गेले होते. तेथून थेट पोलिस भवनात आले. यानंतर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला सावनेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी आयोजित केलेल्या इतवारी परिसरातील प्रेम नगर येथील कार्यक्रम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपूर शहर आणि जिल्हा कार्यालयाला भेट येवढेच त्यांचे नियोजित कार्यक्रम होते.

४५ मिनिटे झाली चर्चा ?

नियोजित कार्यक्रमांदरम्यान अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी वेळ काढून नितीन गडकरी यांच्या घराची वाट धरली. घरी जाऊन त्यांनी गडकरींची भेट घेतली. यावेळी नेत्यांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. पण नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही. आज पोलिस भवनाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण होते. पण गडकरी, फडणवीसांसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचे नाव आणि पद चुकीच्या पद्धतीने छापले आहे आणि नितीन गडकरींची परवानगी न घेता त्यांचे नाव या कार्यक्रम पत्रिकेत छापण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी विधान परिषद सदस्य, प्रवक्ते गिरीष व्यास, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी आदींनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

Nitin Gadkari, Ajit Pawar and Dilip Walse Patil
पवार-गडकरी-राऊत एकाच पंगतीत ; EDच्या कारवाईनंतर पवारांच्या घरी स्नेहभोजन

भाजप-राष्ट्रवादी युतीसाठी तर नाही?

या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही. पण गडकरींचे चाहते सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहेत. नागपुरात आल्यानंतर क्वचितच असं कुणी असेल की ते गडकरींना भेटत नाही. त्यामुळे केवळ सहज म्हणूनही ही भेट असू शकते किंवा गडकरी पोलिस भवनच्या कार्यक्रमाला आले नाहीत, हे सुद्धा एक कारण या भेटीमागे असू शकते. याशिवाय भोंगे आणि हनुमान चालिसा पठण वरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. त्यातच मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू आहे. तिकडे ‘तेव्हा राष्ट्रवादीसोबत युती न करून चूक केली, त्याचे प्रायश्चित्त अजून भोगतोय’, असे वक्तव्य भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यावर ‘आज येवढ्या प्रेमाने ते बोलत आहेत’, असे उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. या घडामोडी पाहता भविष्यात भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर होणार नाहीये ना? आणि त्यासाठीच तर अजित दादा आणि वळसे पाटील यांनी गडकरींची भेट घेतली नाही ना, असे प्रश्‍न चर्चिले जात आहे. शेवटी काय राजकारणात कुणीही कुणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो आणि राजकारणात काहीही घडू शकते, हे २०१९ मध्ये पहाटे-पहाटे या देशाने पाहिलेच आहे. त्यामुळे आजच्या या भेटीकडे विविध ॲंगलने बघितले जात आहे.

आठवले गडकरी आणि पवारांचे सख्य..

आज गडकरींच्या घरी अजित पवार व वळसे पाटलांसह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुखसुद्धा होते. भाजप आणि शिवसेना यांच्यामधून आता विस्तवही जात नाही आणि शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यामधील सख्य अख्ख्या देशाला ठाऊक आहे. हे दोखे मिळून देशाच्या राजकारणात खुप काही घडवून आणू शकतात, असाही एक मतप्रवाह राजकीय जाणकारांमध्ये आहे. 'पहाटे-पहाटे'चा शपथविधी जर होऊ शकतो, तर भाजप-राष्ट्रवादी ही युतीही होऊ शकते. त्यासाठी गडकरी हे उत्तम 'पुल' ठरू शकतात, कारण गडकरी, रोडकरी, पुलकरी अशी त्यांची ओळख जगभर आहे. त्यामुळे हे शक्यसुद्धा होऊ शकते, अशीही एक चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.