
Akola Maratha Aarakshan Andolan News : जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने अकोल्यात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाने काल (ता. आठ) सकाळपासूनच निदर्शने, आंदोलन, निवेदन असा क्रम चालविल्याने सायंकाळी उशिरापर्यंत अकोल्यातील बाजारपेठ बंद होती. (The market in Akola was closed till late evening)
बंदमुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. शुक्रवारी सकाळपासूनच अकोला जिल्ह्यातील दुकाने, शाळा, बाजार, एसटी, पेट्रोल पंप सर्वंच बंद होते. जिल्ह्यातील अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. अकोला शहरातील पोलिस पेट्रोल पम्प वगळता सर्व पेट्रोल पम्पही बंद होते.
विविध संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्याने कालचा बंद कडकडीत झाला. अकोला शहरातील दुकाने, शाळा, बाजार, एसटी, पेट्रोल पंप सर्वंच बंद ठेवण्यासाठी शांततामय मार्गाने विनंती करण्यात आली. मराठा समाजाच्या आंदोलकांनी स्वराज भवनजवळ एकत्र येत निदर्शनेही केली. यावेळी कुणीही आक्रमक झाले नाही की, अनुचित प्रकार घडला नाही.
बंदच्या पार्श्वभूमीवर अकोला (Akola) जिल्ह्यात तगडा पोलिस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील अनेक चौकांमध्ये पोलिसांना स्थायी स्वरूपात तैनात करण्यात आले होते. जिल्हाभरात बंद पुकारण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळानेही अनेक बसफेऱ्या रद्द केल्या. लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या खामगावमार्गे वळविण्यात आल्या होत्या.
बंदला अकोल्यातील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडीसह सर्व राजकीय पक्ष, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅंड इंडस्ट्रीज, सराफा असोसिएशन, हॉटेल्स, धान्य व्यापारी, किराणा बाजार असोसिएशन, व्यापारी आडतीया संघटना, ग्रेन मर्चंट असोसिएशन, पेट्रोल पम्प असोसिएशन, बांधकाम व्यावसायिक संघटना, आयएमए , इंजिनिअरिंग अॅन्ड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, चर्मकार फोर प्लस ग्रुप आदींचा पाठिंबा होता.
उद्यापासून कुणबी समाज रस्त्यावर उतरणार..
मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी पुढे आली. याला कुणबी समाज आणि एकंदरीतच ओबीसी संघटनांचा विरोध आहे. यासाठी उद्यापासून रस्त्यावर उरतण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व शाखीय कुणबी संघटना आणि ओबीसी संघटनांची काल (ता. आठ) संयुक्त बैठक नागपुरात झाली. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास तीव्र विरोध दर्शवण्याकरिता रविवारपासून (ता. १०) संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीत भाजप आणि काँग्रेसचे आजी-माजी आमदारही सहभागी झाले होते.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.