
Nagpur : भाजपने आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने जोरदार तयारी सुरू केली आहे, तर मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' आघाडी उघडली आहे. विरोधकांनी देशात भाजपविरोधात रान उठविण्यास सुरुवात केली असतानाच आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने मोठा दावा केला आहे.
देशातील नरेंद्र मोदी(Narendra Modi) नावाचा प्रभाव आता कमी झाला आहे. पुन्हा एकदा देशात काँग्रेसची लहर तयार होत असल्याचं विधान केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या माध्यमातून ही बाब पुढे येईलच, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरही टीकेची झोड उठवली. पटोले म्हणाले, महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरीरावर आलिशान जॅकेट घालून सांगत फिरतात. पण वास्तविकतेत अलीकडेच आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्रात उद्योगांचा मोठा ऱ्हास झाल्याची बाब पुढे आली आहे. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र आणि देश पिछाडीवर गेला असल्याची टीकाही त्यांनी केली.
तसेच काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे या सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. काँग्रेसशासित प्रदेशांमधील जनता आनंदात आहे व तेथे वेगाने विकास होत असल्याची बाबही या सर्वेक्षणात असल्याचा दावा आमदार पटोले यांनी केला.
काँग्रेसच्या(Congress) प्रचारार्थ आपण देशभरात फिरत आहोत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कुणाला कौल दिला हे सर्वांनी पाहिले. अनेक राज्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. देशात काँग्रेसची लहर सुरू झाली. परंतु आपल्या विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआय, आयकर अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने संपविण्याचा घाट केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. ही बाब लोकशाहीसाठी पोषक नाही असे ते म्हणाले.
विशेष अधिवेशन घेण्यामागचा केंद्र सरकारचा हेतू काय ?
कोणत्याही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविणे ही बाब भयावह आहे. लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही. संसदेचे विशेष अधिवेशन नेमके कशासाठी आहे, हे एक कोडं आहे, असं आमदार पटोले म्हणाले. सरकारजवळ विशेष अधिवेशन बोलावण्यासारखे कोणतेही ठोस मुद्दे दिसत नाहीत.
महिला आरक्षणासंदर्भात विधेयक अधिवेशनात मांडले जाईल, असे अजिबात वाटत नाही, मग विरोधकांना विश्वासात न घेता हे अधिवेशन घेण्यामागे केंद्र सरकारचा नेमका हेतू काय, याचा शोध घेणे गरजेचे आहे. आपले व्यक्तिगत अजेंडा आणि कोट्यधीश मित्रांना फायदा घेण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार काम करीत आहे. त्यांना या अधिवेशनातून फायदा होणार असेल, तर ही बाब चुकीची असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली.
बाहुले बनू नका, फडणवीसांना सल्ला
महाराष्ट्राला अनेक वर्षांची राजकीय परंपरा आहे. वेगवेगळ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी संघर्ष केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकरांच्या हातातील बाहुले न बनता महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यावे, असा सल्लाही पटोले यांनी या वेळी दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.