लंपी : ५ किमी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा, पशुसंवर्धन विभाग हायअलर्ट वर

जनावरावर लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, घाबरून जाऊ नये, योग्य उपचार करावा, असे आवाहन नागपूर (Nagpur) जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Lampi at Nagpur
Lampi at NagpurSarkarnama

नागपूर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहेत. जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून पाच किलोमीटर परिसरात पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या आजारावर इलाज असून नागरिकांनी जनावरावर लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, घाबरून जाऊ नये, योग्य उपचार करावा, असे आवाहन नागपूर (Nagpur) जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज सावनेर तालुक्यातील बडेगाव आणि उमरी जांभळापाणी या दोन गावांमध्ये लंपी रोगसदृश्य लक्षणे दर्शवणारे अनुक्रमे तीन आणि सहा अशा एकूण नऊ पशु रुग्णांची नोंद झालेली आहे. सदर बाब कळताच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, डॉक्टर युवराज केने सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नागपूर यांनी तात्काळ बाधीत गावांना भेट देऊन पशु रुग्णांची तपासणी केली.

नमुने गोळा करण्याची प्रक्रिया राबवलेली आहे. गावातील पशुपालकांना रोगाबाबत सविस्तर माहिती देऊन करावयाच्या प्रतिबंधक उपाय योजनेची माहिती देण्यात आली. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला तात्काळ गावातील सर्व गोठे, साचलेली डबकी, निरोगी जनावरे यांची फवारणी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. गोळा करण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी आणि रोगाच्या निदानासाठी रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवले जाणार आहे. दोन्ही गावांच्या आजूबाजूला पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जवळपास वीस गावांचा समावेश होत असून त्यामध्ये सुमारे ५१२६ एवढ्या गोवंशीय पशुधनाची संख्या आहे. या गावातील पशुपालकांना सतर्क करण्यात आले आहे.

सदर सर्व जनावरांना, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन ही लस लावण्यात येणार आहे. सदर लसीकरणाचे काम येत्या 72 तासात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तुकड्यांचे नियोजन केलेले आहे. लंपी त्वचारोग हा गो -महिष वर्गीय पशुधनामधील विषाणूजन्य आजार असून त्याचा प्रादुर्भाव सर्व वयाच्या पशुंना होतो. या आजाराचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे जसे मच्छर गोचीड, माशा तसेच आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणातून वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, दूध ,लाळ ,वीर्य व इतर स्त्रावांमुळे मुळे होतो. या आजारात पशूंना ताप येणे, पूर्ण शरीरावर दहा ते पंधरा मिलीमीटर व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड नाक डोळ्यात व्रण निर्माण होणे, चारा खाण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भूक कमी होणे, वजन कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे दिसून येतात काही वेळा खूपच दाह आणि स्तनदाह सुद्धा दिसून येतो. पायावर सूज येऊन जनावरे लंगडतात. योग्य औषध उपचार केल्याने बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात पूर्णपणे बरी होतात. रोगाने बाधित जनावरांना तात्काळ निरोगी जनावरांपासून वेगळे बांधण्यात यावे आणि त्यांचा औषधोपचार जागीच करण्यात यावा. रोगाने बाधित झालेली जनावरे विकू नये अथवा त्यांची वाहतूक करू नये, असे आवाहनही पशुपालकांना करण्यात आले आहे.

Lampi at Nagpur
Jayant Patil : नागपूर दौऱ्यात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांचा घेतला क्लास...

लंपी रोग हा अनुसूचित रोग असल्यामुळे प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रुपास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये इतर कुठेही पशु रुग्णांची नोंद झालेली नसून पशुपालकांनी घाबरून जाऊ नये बाधित जनावरांना औषधोपचारासाठी लागणारी सर्व औषधी जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूर यांनी यापूर्वीच लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता करावयाच्या प्रभावी प्रतिबंधक उपाययोजना बाबत आदेश निर्गमित केले आहे. असून त्यानुसार जिल्ह्यातील महसूल, पोलीस, परिवहन, ग्रामविकास, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्था यांना आवश्यक निर्देश दिलेले आहेत. पशुपालकांनी आणि ग्रामस्थांनी तसेच सर्व जबाबदार नागरिकांनी लंपी सदृश्य लक्षणे दिसणाऱ्या पशु रुग्णाला बघितल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा ग्रामपंचायतची संपर्क करावा आणि सदर बाब निदर्शनास आणून द्यावी. नागपूर जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोगाला तोंड देण्यासाठी पशुसंवर्धन आणि सर्व संबंधित विभागांची यंत्रणा तयार आणि जागरूक आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in