Ashish Deshmukh : राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणे प्रदेशाध्यक्षही निवडणुकीतून निवडावा...

Congress : सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे.
Ashish Deshmukh
Ashish DeshmukhSarkarnama

Maharashtra Congress News : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज तोफ डागली. महाविकास आघाडी तर सोडा, पण महाराष्ट्रात आज कॉंग्रेसही एकसंघ नाही राहिली. नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असे डॉ. देशमुख (Ashish Deshmukh) ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

सर्व बाजूंनी कॉंग्रेस (Congress) सपशेल तोंडघशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपने पाठिंबा दिलेले सत्यजीत तांबेसारखे (Satyajeet Tambe) अपक्ष उमेदवार पाचही जागांवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापती पदाचा तिढा तयार होईल. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही, असे डॉ. देशमुख म्हणाले.

एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वत:च्या सत्तेची पडलेली आहे. अशा कॉंग्रेस विरोधी घटना घडत असताना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. असेच सुरू राहिल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. ज्या कॉंग्रेसची पाळेमुळे शहरांपासून तर ग्रामीण भागांपर्यंत रोवली गेली होती, त्या पक्षाकडे कार्यकर्तेच उरले नाहीत. म्हणजेच पक्षाचा कणा उरलेला नाही. पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न राज्यातील कॉंग्रेससमोर उभा ठाकला आहे.

संघटनेची घडी विस्कळीत झालेली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. चैतन्य निर्मितीसाठी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुण वर्गाची गर्दी बघता एका नव्या वर्गाला कॉंग्रेस जवळची वाटत आहे. कॉंग्रेसपासून दुरावलेली माणसे जोडण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत. परंतु, हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी ठोस रणनीती प्रदेशाध्यक्षांना कितपत जमेल, ही शंका आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्व नसणारा पक्ष म्हणून दिसत आहे.

Ashish Deshmukh
Ashish Deshmukh: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीवर डाॅ. आशिष देशमुख यांचा आक्षेप

विविध निवडणुकींमध्ये सतत होणारे पराभवाचे कारण म्हणजे पक्षाची झालेली दयनीय अवस्था आहे. या पक्षात नेते उरले आहेत. परंतु कार्यकर्ते नाहीत. राज्यात या पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षांपासून बदलला नाही. गेली अनेक वर्षे त्याच त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नवे चेहरे क्वचितच दिसतात.

परिणामी राजकीय करिअरसाठी कॉंग्रेस विचारसरणीचे लोक इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा आणि इतर माध्यमांतून तसेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या मदतीने कॉंग्रेस पक्षाची पुनर्बांधणी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, महाराष्ट्राचे काय, हा प्रश्न तसाच कायम राहतो, असे डॉ. आशिष देशमुख यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com