चुका होत असल्यास कळवा, दुरुस्त करू; पण स्वार्थापोटी विरोध करू नका...

वैयक्तिक स्वार्थापोटी महाज्योतीला बदनाम करू नका, असे कळकळीचे आवाहन ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विरोधकांना केले आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

नागपूर : महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी वर्गाच्या उत्थानाचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे. हे कार्य करीत असताना काही चुका होणे शक्य आहे. चुका होत असल्यास कळवा; त्याचा विचार होईल, दुरुस्तीही केली जाईल. परंतु, वैयक्तिक स्वार्थापोटी संस्थेला बदनाम करू नका, असे कळकळीचे आवाहन ओबीसी (OBC) विकासमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विरोधकांना केले आहे.

वडेट्टीवार यांनी महाज्योतीमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, ओबीसी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्थान हा सुद्धा महाज्योतीचा मुख्य उद्देश आहे. त्या उद्देशाने करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहेत. यात ओबीसी समाजातील बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहेत. यातील १० क्लस्टर आपल्या मतदारसंघात आहेत. मुळात ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना येथे रोजगार उपलब्ध होईल.

विरोधकांकडून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. महाज्योतीतर्फे सद्यःस्थितीत वाशीम, बुलडाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या सात जिल्ह्यात करडई या तेलबिया पिकांचे उत्पादन करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या सात जिल्ह्यातील ६,९४९ शेतकऱ्यांना ६४६४.४५ हेक्टर म्हणजेच १६,१६२ एकर क्षेत्राकरिता प्रति एकर ४ किलो प्रमाणे एकूण ६४६.६० क्विंटल बियाणे मोफत वाटण्यात आले आहे. या व्यवहारात ५ कोटी ११ लाख रुपये इतका नफा अपेक्षित आहे. या प्रकल्पातून तेलाचा ब्रॅण्ड तयार होणार असून त्यातून शेतकऱ्याला रब्बी हंगामाकरिता हमखास उत्पन्नाची सोय नेहमीकरिता प्राप्त होईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला महाज्योती संचालक मंडळाचे सदस्य दिवाकर गमे व डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते.

उमरेड रोडवर प्रशिक्षण केंद्र..

महाज्योती मुख्यालय तेलंखेडीजवळ तयार होणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाची पाच एकर जागा निश्चित करण्यात आली असून यासाठी विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. उमरेड रोडवर नागपूर सुधार प्रन्यासने अडीच एकर जागा दिली आहे. येथे प्रशिक्षण केंद्रासोबत वसतिगृहही तयार करण्याचे निश्चित आहे. त्यामुळे २० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी एक वसतिगृह तयार करण्यात येणार आहे. सर्व ७२ वसतिगृह एकाचवेळी पुढच्या वर्षी सुरू करण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा केली.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले, आता १२ बलुतेदारांची मुलेही होतील डॉक्टर...

केंद्राकडून ओबीसींच्या शिष्यवृत्तीचा निधी कमी..

केंद्र सरकारकडे ३६ वसतिगृहाची यादी पाठविली होती. परंतु त्याला अद्याप मंजुरी दिली नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधीही पूर्ण दिला नाही. परदेशात शिक्षण घेण्यासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून येणार आहे. या कर्जावरील व्याजाची रक्कम शासन देणार असून यासाठी पाच कोटीची तरतूद करण्यात आली. महाज्योतीचे विभागीय कार्यालय पुणे आणि नाशिक येथे लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदनिका वाटपात आरक्षण..

म्हाडा तर्फे सदनिकेचे वाटप करण्यात येते. या वाटपात ओबीसींसाठी सदनिका आरक्षित ठेवण्याची मागणी गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in