निवडणुकीत नेते सैराट, अन् कोरोना झिंगाट; प्रशासन मात्र कोमात !

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या जागांसाठी येत्या 18 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक (Election) होणार आहे.
Election Crowed
Election CrowedSarkarnama

भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत. सभेला 50 लोकांची परवानगी असताना जाहीर सभांमध्ये शेकडोची गर्दी कोरोनाला आमंत्रण देत आहे. या सभांमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास ऐसीतैसी होत आहे. निवडणुकीनंतर (Election) कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाणार, हे स्पष्ट दिसत आहे. या प्रकारापुढे प्रशासन हतबल झालेले दिसत असून नेते सैराट, कोरोना झिंगाट, अन् प्रशासन मात्र कोमात गेले आहे.

कोरोना (Corona) नियमांना हरताळ फासला जात असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या आकडा भरमसाठ वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर दोन्ही जिल्ह्यांची कोरोना रुग्णाची स्थिती हाताबाहेर जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. असे असताना प्रशासन मुकदर्शक बनत असल्याने नेते सैराट-प्रशासन कोमात आणि कोरोना झिंगाट म्हणत डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या जागांसाठी येत्या 18 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक होणार आहे. विविध पक्षांच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

राजकीय नेत्यांच्या प्रचारसभाच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागल्या आहेत. प्रशासनाकडून राजकीय सभेला 50 लोकांची परवानगी दिली असताना शेकडोची उपस्थिती सभेत राहात असून कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. कित्येकांच्या तोंडावर मास्क राहात नाहीत. तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यातील प्रत्येक पक्षातील नेत्यांच्या प्रचारसभेतून दिसून आले. मात्र यावर अद्याप कुणावरही कारवाई करण्यात न आल्याने सामान्य नागरिकांवर कारवाई आणि राजकीय नेत्यांना अभय दिला जात असल्याची ओरड सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णाची सक्रिय रुग्णसंख्या 393 वर तर गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णाची सक्रिय रुग्णसंख्या 710 वर गेली आहे. विशेष म्हणजे आठवड्याभरात ही रुग्णसंख्या वाढली गेली आहे. यात भंडारा जिल्ह्यात 1134 तर गोंदिया जिल्ह्यात 578 व्यक्तीच्या बळी गेला आहे. यात भंडारा जिल्ह्यात तर ॲडव्हांसमध्ये सरण रचण्याची वेळ आली होती. सर्वत्र ऑक्सिजनच्या तुटवडा व उपचारासाठी रुग्णाच्या नातेवाइकांची उडालेली तारांबळ बघता जिल्ह्यातील नेते मंडळी हे कसे काय विसरले, हाच खरा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Election Crowed
पुणेरी पाट्यांनंतर आता गाजताहेत भंडारा जिल्ह्यातील ‘या’ पाट्या...

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी लादली गेली आहे. सामान्य लोकांना कोरोना लसीचे दोन डोज घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. शासकीय कार्यालयात तर आवश्यक कामासाठी गेलेल्या अभ्यागतांना भेटीसुद्धा नाकारल्या जात आहेत. आता प्रशासनाद्वारे मास्क मोहिमसुद्धा हाती घेतली आहे. प्रशासनाद्वारे योग्य भूमिका घेतली जात असताना राजकीय सभेत कोरोना नियमाचा भंग होताना प्रशासनाने मुकदर्शक बनने योग्य नाही. बिघडत चाललेली परिस्थिती प्रशासनालाच सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर कारवाई आणि राजकीय नेत्यांना अभय हे या महामारीत अजिबात परवडणारे नाही. त्यामुळे आता आयोजित प्रचारसभांमध्ये प्रशासनाने कोरोना नियम पाळण्यासाठी वेळीच हस्तक्षेप केला नाही तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in