कोराडीचा तलाव फुटला; सात गावांचे नागरिक राखेच्या ढिगाऱ्यांत शोधताहेत आयुष्य..!

माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माहिती मिळताच तडक तलावाच्या भिंतीवर पोहोचले. नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली.
Chandrashekhar Bawankule on Koradi Power Plant.
Chandrashekhar Bawankule on Koradi Power Plant.Sarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) शहरानजीक असलेल्या कोराडी पॉवर प्लांटची (Power Plant) राख साठवून ठेवण्यासाठी तयार केलेला तलाव १६ जुलै रोजी फुटला, अन् पाहता पाहता लगतच्या सहा ते सात गावांमध्ये राखयुक्त पाण्याने हाहाकार उडवला. शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके अवघ्या काही तासांत नष्ट झाली, तर लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला.

पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, जलवाहिन्या सर्वकाही राखयुक्त झाले. शेतांमध्ये पिके खरडून जाऊन एक ते तीन फूट राखेचा थर जाऊन बसला. सध्या असलेले पीक तर नष्ट झालेच पण पुढील तीन ते चार वर्षे या शेतांमध्ये पीक घेता येणार नाही. ‘त्या’ शनिवारी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. खसाळ्याचे सरपंच रवी पारधी, खैरीचे सरपंच बंडू कापसे, रनाळा-भिलगाव जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य मोहन माकडे (Mohan Makde) यांनी तात्काळ तलावाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले.

माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माहिती मिळताच तडक तलावाच्या भिंतीवर पोहोचले. नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली आणि प्रशासनाला आवश्‍यक त्या सूचना दिल्या. पाठोपाठ जिल्हाधिकारी विमला आर. सुद्धा घटनास्थळी पोहोचल्या आणि तात्काळ सर्वे करण्याचे आदेश संबंधितांना दिले. आता पंचनामे केले जात आहेत. या प्रकरणात महसूल प्रशासन मदत देणार नाही. जी काही मदत शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी मिळवायची, ती महाजेनकोकडून मिळवावी लागेल आणि नुकसानग्रस्तांना ती मिळवून देऊ, असे आमदार बावनकुळे यांनी तेथे सांगितले. नागरिकांना उद्या चालून मदत मिळेलही. पण आज तरी नागरिक शेतांमध्ये साचलेल्या राखेच्या ढिगाऱ्यांमध्ये आयुष्य शोधताना दिसत आहेत.

या सर्वात गंभीर बाब म्हणजे आज १० दिवस उलटूनही तलावाच्या भिंतीची कायम उपाययोजना करण्यात आलेली नाही. जेथून बंधारा फुटला होता, तेथे राखेच्या ढिगाऱ्यावर सिमेंट पोत्यांचा बंधारा उभारण्यात आलेला आहे. आणखी पाऊस झाल्यास हा तात्पुरता बंधाराही फुटणार, हे निश्‍तिच आहे. उल्लेखनीय म्हणजे खैरी आणि खसाळ्याच्या सरपंचांनी पॉवर प्लांटचे अधिकारी आणि तत्कालीन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना या दुर्घटनेची पूर्वकल्पना दिली होती. पण दुर्दैव असे की, कुणीही त्याकडे गांभीर्याने बघितले नाही आणि आज हजारो लोक टाहो फोडत आहेत.

Chandrashekhar Bawankule on Koradi Power Plant.
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

तीन वर्षांचे नुकसान भरून द्यावे..

राखेचा तलाव फुटल्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तात्पुरती मदत करून सुटणार नाहीये. कारण विषय गंभीर आहे. एकदा राख शेतामध्ये गेली, की ती निघणे अवघड आहे. गरीब शेतकऱ्यांजवळ राखेचे थर काढण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. कापूस, सोयाबीन, फळे, भाज्या आदी सर्व पिके खरडून गेली आणि तेथे राखेचे थर तयार झाले आहेत. किमान तीन वर्षे तरी येथे पीक होणे नाही. त्यामुळे सरकारने तीन वर्षांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.

-मोहन माकडे, जिल्हा परिषद सदस्य, भिलगाव.

शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्यावी..

२९२ हेक्टरमध्ये हा तलाव बांधण्यात आला आहे. येथे पूर्वी खसाळा गाव होते आता त्या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. कवठा, खसाळा, म्हसाळा, भिलगाव, सुरादेवी, वारेगाव आणि खैरी या गावांमधील शेती तीन ते चार वर्षांसाठी निकामी झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरी राखेने भरल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांना पॉवर प्लांटमध्ये नोकरी द्यावी.

-बंडू कापसे, सरपंच, खैरी.

तत्कालिन पालकमंत्र्यांनी केले दुर्लक्ष..

तलावाच्या भिंतीमध्ये लिकेज आहे, याचा व्हिडिओ एक महिन्यापूर्वी पॉवर प्लांटच्या अधिकाऱ्यांना दिला होता. तत्कालिन पालकमंत्री नितीन राऊत यांनाही परिस्थिती कळवली होती. पण सर्वांनी सवयीप्रमाणे हलगर्जीपणा केला. येवढेच नाही तर भिंत फुटल्यावरही आम्ही पाणी सोडले, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शेतांत राख, रस्त्यांवर राख, विहिरींमध्ये राख आमचे जीवनच राखयुक्त झाले आहे. आजही चार फुटापर्यंत राखयुक्त पाणी शेतांमध्ये साचलेले आहे. राखेमुळे शेती पिकत नाही, त्यामुळे काही शेतकऱ्यांनी विटाच्या भट्ट्या लावल्या, त्यासुद्धा यामध्ये वाहून गेल्या आणि प्रचंड नुकसान झाले.

-रवी पारधी, सरपंच, खसाळा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com