
Lathi charge in Jalanya News : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक उपोषणाला बसले होते. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी निर्घृण लाठी हल्ला केला. याचा निषेध करीत वंचित बहुजन युवा आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. (The police brutally attacked the march with sticks)
पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात महिला आंदोलकांसह अनेकजण गंभीर जखमी झाले. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केलेल्या या लाठी हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. सरंजामी मराठा नेतृत्वाचा या आरक्षणाला विरोध असल्यामुळेच हा लाठीमार करण्यात आल्याचा आरोप वंचितने केला आहे.
लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या (ता. तीन) जालना व बीड येथे होणाऱ्या बंदच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi) पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे, असे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांमार्फत (Police) अमानवी लाठीचार्ज, अश्रुधूर कांड्यांचा वापर आणि हवेत केलेल्या गोळीबारानंतर वंचित बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीने आज (ता. २) अकोल्याच्या महाकाली चौकात रास्ता रोको आंदोलन करत घोषणा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, पूर्व महानगर अध्यक्ष जय तायडे, शंकरराव इंगळे, तालुकाध्यक्ष मिलिंद दामोदर, कुणाल राऊत, सचिन शिराळे, दादाराव पवार, आनंद खंडारे, संतोष गवई आदी होते.
जालन्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. ही घटना निंदनीय असून याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शब्द पाळला नसल्यानेच पुन्हा आंदोलन करण्याची वेळ मराठा समाजावर आल्याचे म्हणत पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला.
आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही वेळात धुळे - सोलापूर महामार्गावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आंदोलनादरम्यान, दगडफेक झाल्याने पोलिसही जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणत विरोधकांनी या लाठीचार्जचा निषेध केला आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.