भाजपशिवाय निवडून येणे शक्य नाही, म्हणून खासदार तुमाने शिंदे गटात?

शिंदेंसोबत (Eknath Shinde) राहिलो तरच भाजपाची साथ मिळेल व पुढील मार्ग सुकर होईल, ही दूरदृष्टी ठेवूनच तुमाने यांनी तसा निर्णय घेतला असावा, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
MP Krupal Tumane in Eknath Shinde Group
MP Krupal Tumane in Eknath Shinde GroupSarkarnama

राम वाडीभष्मे

मौदा (जि. नागपूर) : काही दिवसांपूर्वीच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच आहोत, असे सांगणारे विदर्भातील (Vidarbha) पौराणिकदृष्ट्या महत्त्वाच्या रामटेक (Ramtek) लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले, शिवसेनेचे Shivsena) खासदार कृपाल तुमाने हे मंगळवारी १८ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले. रामटेकच्या गडावर ते सलग दोनदा (२०१४ व २०१९) शिवसेनेचा भगवा फडकवीत आले आहेत.

२०२४च्या निवडणुकीत भाजपाच्या (BJP) मदतीशिवाय रामटेकचा गड सर करणे सोपे नाही. म्हणून शिंदे गटात सहभागी झालो. शिंदेंसोबत राहिलो तरच भाजपाची साथ मिळेल व पुढील मार्ग सुकर होईल, ही दूरदृष्टी ठेवूनच तुमाने यांनी तसा निर्णय घेतला असावा, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. ते शिंदे गटात का गेले असतील? याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे.

मतदारसंघात इतरांप्रमाणे मी गायब राहणारा नाही..

माझी ताकद मला माहिती आहे आणि ती निवडणुकीत दिसणारच. मी नेहमी मतदारसंघातच राहतो, मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडविण्यातच व्यस्त असतो. मी अशी कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली नसून, माध्यमे किंवा इतर आपल्या मनाने काहीही भासवून अंदाज बांधत आहेत. मी निवडून आल्यानंतर इतरांप्रमाणे मतदारसंघातून गायब होणारा नाही. असा टोला आधीच्या नेत्यांना लावत, आपल्या मतदारसंघात नेहमी तत्परतेने कार्यरत राहतो व नेहमीच लोकसंपर्कात असतो. त्यामुळे मला निवडणुकीला समोर जाण्यास कोणतीही अडचण नाही. असे खासदार तुमाने यांनी सांगितले.

बाकीचे खासदार कुठेही गेले तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच..

कृपाल तुमाने यांनी काही दिवसांपूर्वी बाकीचे खासदार कुठेही गेले तरी मी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हा शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. परंतु शिंदे गटात शामिल होणाऱ्या १२ खासदारांपैकी ते एक आहेत. राष्ट्रपती पदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा म्हणून शिवसेनेच्या दोन खासदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र दिले. यानंतर शिवसेना खासदार बंड करतील म्हणून, ठाकरेंनी लोकसभेतील गटनेत्याचे पद काढून घेतले. शिवसेना बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असतानाच शिवसेनेच्या १० खासदारांची गुप्त बैठक तुमाने यांच्याच घरी झाल्याची चर्चा रंगल्याने चर्चांना उधान आले होते.

यावर तुमाने यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, मी गेले सहा दिवस नागपूरमध्येच आहे. मग दिल्लीत बैठक कशी घेणार? असा सवाल करत, शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी सहा खासदार पंढरपूरला गेले आहेत. मुंबईत तीन खासदार आहेत. इतरांना मी फोनवरून विचारले असता, ते त्यांच्याच गावी असल्याचे म्हणाले. यामुळे आमची कोणतीही बैठक झाली नसल्याचे तुमाने यांनी स्पष्ट केले होते.

MP Krupal Tumane in Eknath Shinde Group
शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची कृपाल तुमानेंच्या घरी बैठक झाली...? तुमाने स्पष्टच म्हणाले...

रामटेक लोकसभेचा इतिहास थोडक्यात..

रामटेक लोकसभेत दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपासून तर बाराव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सलग काँग्रेसचे ११ खासदार विजयी झाले होते. यात महत्त्वाचे असे भारताचे माजी प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंहराव हे सुद्धा याच मतदारसंघातून दोनदा निवडून संसदेत गेलेत. १९९९ ते २००४ शिवसेनेचे सुबोध मोहिते हे पहिल्यांदा तर दुसऱ्यांदा २००४ ते २००७ आणि २००७ ते २००९ प्रकाश जाधव असे सलग तीनदा शिवसेनेने काँग्रेसच्या बालेकिल्ला उद्धस्त करत ताब्यात घेतला होता. पण २००९ ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला व यात काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी फक्त १६ हजार मतांनी कृपाल तुमाने यांना पराभूत करत निसटता विजय मिळवला.

मतदारसंघात कार्यरत राहिलो तर पुढील निवडणूक जिंकू शकतो..

आपण मतदारसंघात कार्यरत राहिलो तर पुढील निवडणूक जिंकू शकतो, हा विश्वास ठेऊन तुमाने यांनी त्यानुसार पाच वर्षे मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत जनसंपर्क तयार केला. व त्यातून त्यांची सामान्य माणूस अशी प्रतिमा तयार झाली. त्याचा त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत फायदा होऊन व यावेळी मुकुल वासनिक यांचा तब्बल १ लाख ७५ हाजर ७९१ मतांनी पराभव केला. तुमाने यांच्यावतीने पुन्हा रामटेकच्या गडावर शिवसेनेने ताबा मिळवत, २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांचाही सव्वा लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. या दोन्ही निवडणुकीत भाजपा-सेना युती होती. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची मदत कशी आवश्यक आहे, हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळेच प्रदेश पातळीवर सेना-भाजपा युतीत वाद झाले तरी तुमाने यांनी मतदारसंघाच्या पातळीवर भाजपा नेते व कार्यकर्त्यांसोबत दुरावा येऊ दिला नाही.

नागपूर ग्रामीण मधील राजकीय आकडेवारी..

नागपूर ग्रामीणमध्ये ६ विधानसभा मतदारसंघ असून सावनेर मतदारसंघ सोडून उर्वरित पाच मतदारसंघांत भाजपाने निवडणूक लढवली होती. त्यात भाजपला एकूण ४ लाख ३२ हजार ९८० मते मिळाली, तर शिवसेनेला १ लाख ६३ हजार मते मिळाली. त्यातही सावनेर विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपने मदत केली. हिंगणा व उमरेड मतदारसंघांत शिवसेना १० हजारांच्या आत, तर काटोल व कामठी मतदारसंघात १५ हजारांच्या आतच निपटली होती. जिल्ह्यात एकूण १४ नगरपरिषद असून त्यापैकी ८ भाजपाच्या तर एक सेनेच्या ताब्यात आहे. सोबतच ६ नगरपंचायत आहेत. जिल्हा परिषदेत भाजपाचे १४ सदस्य असून शिवसेनेचा एकमेव सदस्य आहे.

https://www.sarkarnama.in/mumbai/eknath-shinde-gives-reply-to-uddhav-thackeray-yk75

रामटेकचा गड आधीच पोखरला गेला..

ग्रामीणमध्ये ६ पैकी दोन आमदार हे भाजपाचे असून २०१४ मध्ये सेनेकडून भाजपविरोधात लढलेले आमदार आशीष जयस्वाल हे, २०१९ मध्ये भाजप-सेना युतीत रामटेकची जागा भाजपला गेली. त्यामुळे आशिष जयस्वाल अपक्ष लढले व ६७ हजार ४१९ मते मिळवून विजयी झाले. मात्र शिवसैनिक म्हणून एकमेव असलेले आमदार आशिष जयस्वाल हे सुद्धा शिंदे गटात गेल्याने, रामटेकचा गड आधीच पोखरला गेला.

तुमाने यांच्याबद्दल थोडक्यात..

अडीच दशकाहून अधिक काळ काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी २००७ साली शिवबंधन बांधले. त्यातही २००९ साला पासून रामटेक लोकसभा हे अनुसूचित जाती करिता राखीव असल्याने तिथे शिवसेनेला अनुसूचित जातीतील उमेदवाराचा शोध सेनेकडून सुरू होता. त्यात तुमाने हे अनुसूचित जातीतील पण हिंदू धर्मीय असल्याने त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यात त्यांचा फक्त १६ हजार मतांनी पराभव झाल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विदर्भ सहसंपर्क प्रमुख पद बहाल केले होते. खासदारपदी निवडून आल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये त्यांनी अनुसूचित जाती, जमाती कल्याण समितीसह वाहतूक, पर्यटन, सांस्कृतिक, विमान वाहतूक आदी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले. कोळसा व खाण, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू सल्लागार समितीचे सदस्यपद भूषवले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in