एकटे अजित पवार म्हणजे महाराष्ट्र आहेत का? हा महाराष्ट्राचा अपमान नाहीच !

अजित पवार (Ajit Pawar) यांनीही आजचा कार्यक्रम हा अपमान म्हणून घेऊ नये, असा सल्लासुद्धा आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.
एकटे अजित पवार म्हणजे महाराष्ट्र आहेत का? हा महाराष्ट्राचा अपमान नाहीच !
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar on Dehu ProgrameSarkarnama

नागपूर : देहू येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न देणे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी नारे निदर्शने केली. त्यावर एकटे अजित पवार म्हणजे महाराष्ट्र आहेत का, असा सवाल माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. (Chandrashekhar Bawankule News)

अजित पवार (Ajit Pawar) यांनीही आजचा कार्यक्रम हा अपमान म्हणून घेऊ नये, असा सल्लासुद्धा आमदार बावनकुळे यांनी दिला आहे. पंतप्रधान (Prime Minister) आपले कार्यक्रम त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार करतात. त्या मिनिट टू मिनिट कार्यक्रमात अजित दादांच्या भाषणाचा उल्लेख नसेल, त्यामुळे त्यांचे भाषण नाही झाले. हा कार्यक्रम पीएमओकडून येतो. त्यामुळे नियोजित कार्यक्रमात त्यांचे भाषण ठेवले होते की नाही, हे आधी बघावे लागेल, बरेचदा उपमुख्यमंत्र्यांच्या शेड्युलमध्ये पालकमंत्र्यांचे भाषण ठेवले जात नाही. याचा अर्थ तो पालकमंत्र्यांचा अपमान आहे, असो होत नाही, असेही आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. (Ajit Pawar News)

यापेक्षा सगळ्यात महत्वाचे म्हणजे, विमानतळावर स्वागत करायला गेले असताना पंतप्रधान मोदीजींनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून आस्थेने त्यांची विचारपूस केली. त्यामुळे आकस वगैरे असण्याचे कुठलेही कारण दिसत नाही. पण आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते त्यांचे भाषण न झाल्यामुळे टिका करू लागले आहेत. पण हे काही आज नाही घडले. अनेकदा असे होते की, वेळेअभावी मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे पालकमंत्र्यांचे भाषण डावलले जाते. आज पंतप्रधानांच्या वेळेअभावी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे भाषण नसेल झाले, तर त्याच्यावर आता राजकारण करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

बरेचदा उपमुख्यमंत्री बोलायचे राहून गेलेले असतात आणि मुख्यमंत्री माईक घेऊन बोलतात. हे सर्व त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. महाविकास आघाडी सरकारमध्येही असे अनेकदा झालेले आहे. नागपुरात पोलिस आयुक्त कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव सहाव्या क्रमांकावर टाकण्यात आले होते. मग तेव्हा महाराष्ट्राचा आणि नागपूरच्या जनतेचा अपमान झाला नाही का, असे म्हणत आम्ही नारे, निदर्शने असला कुठलाही प्रकार तेव्हा केला नाही, ही आठवण आमदार बावनकुळेंनी करवून दिली.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar on Dehu Programe
बावनकुळे कडाडले; म्हणाले, ‘महाविकास’च्या ओबीसी मंत्र्यांनी आता पदावर राहू नये...

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने हजारो कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन करताना, ते मेट्रो असो की समृद्धी महामार्ग फडणवीसांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाकायचे म्हणून टाकले, अन् त्यांना कार्यक्रमाला बोलावलेसुद्धा नाही. पण आज देहूत तर उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावले, ते व्यासपीठावर विराजमानदेखील होते. त्यामुळे त्यांचा अपमान झाला असे मला वाटत नाही. त्यामुळे अजित पवारांनी हा अपमान मानून घेऊ नये. कारण आज अजित पवार महाराष्ट्रासाठी कुठली घोषणा वगैरे करणार होते, असेही नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी चालवलेली उठाठेव ही निरर्थक आहे. अमोल मिटकरीसारख्या नेत्यांनी अतिउत्साहीपणा करू नये. कारण यापूर्वी अतिउत्साहात ते एकदा अडचणीत आलेले आहेत, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in