नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भासोबतची प्रतिबद्धता सिद्ध करावी...
Dr. Ashish DeshmukhSarkarnama

नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भासोबतची प्रतिबद्धता सिद्ध करावी...

अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाय-योजना काढण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

नागपूर : नागपूर कराराप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रकोप होता, हे समजले जाऊ शकते. पण यावर्षी तशी स्थिती नाहीये. नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भाप्रति असलेली प्रतिबद्धता सरकारने सिद्ध केली पाहिजे, असे काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले.

आता नागपुरात अधिवेशन होणार नसेल तर मार्च २०२२ मधील ‘बजेट अधिवेशन’ किमान २ महिने नागपूरला घ्यावे आणि विदर्भासाठी जास्तीची भरीव तरतूद मुंबई येथील या अधिवेशनात करावी, अशी मागणीही डॉ. देशमुख यांनी केली आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे डिसेंबर २०२१ मध्ये मुंबई येथे करणार असल्याचं राज्य सरकारच नियोजन झालं असून त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. खरं तर नागपूर कराराप्रमाणे हे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे होतं. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईला झाले होते. मागील पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर येणारे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणासुद्धा करण्यात आली होती. असे असतानादेखील हे अधिवेशन मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

मुंबई येथे विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे असल्यास, अधिवेशनाच्या ४५ दिवस आधी नियमानुसार विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन मुंबईच्या अधिवेशनावर शिक्कामोर्तब केले जाते. परंतु तसे काही झालेच नाही. नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भाच्या विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन दरवर्षी व्हावे, असा नियम आहे. विदर्भातील उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पर्यटन, गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाय-योजना काढण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

Dr. Ashish Deshmukh
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काय म्हणाले डॉ. आशिष देशमुख ?

नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन ज्या हेतूसाठी भरवले जाते, तो हेतू त्यातून पूर्णत्वास जात नसेल, तर विदर्भाचा विकास होणारच नाही. विदर्भातील २ कोटी जनतेच्या दृष्टीने नागपूरला हे अधिवेशन न होणे, ही निंदनीय बाब आहे. यावर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नाही. तेव्हा आता मार्च २०२२ मधील ‘बजेट अधिवेशन’ किमान २ महिने नागपूरला घ्यावे आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने त्यात भरीव अशी तरतूद करून द्यावी, अन्यथा हे सरकार विदर्भाप्रती असंवेदनशील आहे, असा जनतेचा समज होईल. हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे ही निंदनीय बाब आहे आणि या कृतीचा वैदर्भीय जनता निषेध करीत आहे, असे माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख म्हटले आहे.

विदर्भासाठी जास्तीची भरीव तरतूद मुंबई येथील या अधिवेशनात करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नागपूर कराराप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२१ मध्ये नागपूरला घेण्याबाबत एक विनंतीपत्र डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यापूर्वीच पाठविले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in