भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी पोहोचली चरम सीमेवर...

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात भाजपचा (BJP) तिसरा गट नुकताच भंडारा (Bhandara) जिल्ह्यात सक्रिय झाला आहे.
Sunil Mendhe and Charan Waghmare
Sunil Mendhe and Charan WaghmareSarkarnama

भंडारा : भंडारा भाजपमध्ये गटबाजी चरम सीमेवर पोहोचली असून जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार सुनील मेंढे व आमदार परिणय फुके यांचा गट कमी होता की काय, आता माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात भाजपचा तिसरा गट नुकताच भंडारा (Bhandara) जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भंडाऱ्यात भाजपला (BJP) तोंडघशी पडावे लागले.

‘सरकारनामा’ने निवडणकीपूर्वीच जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी वाढल्याचे वृत्त दिले होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या गटबाजीला फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. जिल्ह्यात गटबाजी वाढत जाऊन त्याचा मोठा फटका नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला बसला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ‘तो माझा कार्यकर्ता’ या भूमिकेतून तिकिटे वाटण्यात आली, तर काही ठिकाणी बंडखोरांना प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाल्याने भाजपचे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. आता जिल्ह्यात भाजपने स्वतः आपला होमवर्क वाढवून घेतल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता तरी भाजपला खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे. वेळीच वरिष्ठांनी याबाबत लक्ष न दिल्यास जिल्ह्यात भाजप हद्दपार झाल्या शिवाय राहणार नाही, हेही तेवढेच खरे.

भाजप हा अनुशासन व शिस्तप्रिय पक्ष म्हणून देशात ओळखला जातो. भंडाऱ्यात मात्र याउलट चित्र पाहायला मिळते. मागील काही काळापासून भंडारा जिल्हा भाजपमध्ये गटबाजी प्रचंड उफाळून आली आहे. कॉंग्रेसचा हा आजार आता भाजपला लागला आहे. सुरुवातीला फक्त पक्षांतर्गत असलेली गटबाजी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीमध्ये खुलेआम दिसून आली. त्याचाच फटका म्हणून भाजपला तिसऱ्या क्रमांकावर मतदारांना फेकले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ‘तो माझा कार्यकर्ता’ या भूमिकेतून तिकिटे वाटण्यात आली. तर काही ठिकाणी बंडखोरांना प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाल्याने भाजपचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

या गटबाजीचा परिणाम म्हणून काय नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेत भाजपला जिल्ह्यात केवळ 12 जागा मिळाल्या असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली आहे. जिल्ह्यात 52 जागांपैकी केवळ 12 जागा निवडून आल्याने 40 जागांवर भाजपला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पक्षाचे पदाधिकारीच निवडणुकीत हरल्याने भाजपला जिल्ह्यात गटबाजी भोवल्याचे स्पष्ट झाले आहे. यात भाजपची हायप्रोफाइल जिल्हा परिषद जागेवर माजी जिल्हा परिषद गटनेते व भाजपचे भंडारा-पवनी विधानसभेचे मागील आमदारपदाचे उमेदवार राहिलेले अरविंद भालाधरी हे खमारी जिल्हा परिषदेच्या जागेवर पराजित झाले.

अनुसूचित जनजाती सेलचे भाजप प्रदेश सचिव नेपाल रंगारी वडद जिल्हा परिषदेच्या जागेवर पराजित झाले, तर भंडारा भाजप उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनाही आपली जिल्हा परिषद जागा निवडून आणता आली नाही. इतके कमी होते की काय खासदार सुनील मेंढे यांच्या पवनी तालुक्यातील आपल्या स्वगावची आसगाव जिल्हा परिषदेची जागा वाचविता आली नाही. तिथे काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. दुसरीकडे नुकतेच भंडारा भाजप जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेले शिवराम गिरिपुंजे यांच्या लाखनी शहरातील नगर पंचायत त्यांना वाचविता आली नाही. एकेकाळी सत्तेत असलेल्या भाजपचा तिथे सुपडा साफ झाला आहे. जर तालुक्याच्या विचार केला असता तर खासदार सुनील मेंढे यांच्या भंडारा एक, माजी भाजप आमदार रामचंद्र अवसरे पवनी तालुक्यात एक, माजी आमदार बाळा काशिवार यांच्या साकोली तालुक्यात दोन, जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे यांच्या लाखनी तालुक्यात एक तर विधानपरिषद सदस्य यांच्या विशेष प्रेम असलेल्या लाखांदूर तालुक्यात दोन आले आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात माजी आमदार चरण वाघमारे यांनी समाधानी कामगिरी करत अनुक्रमे चार आणि एक जागा जिल्हा परिषदेत मिळविल्या आहे. भंडारा भाजपला आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ झाली असून आपण कुठे कमी पडतोय, हे समजणे गरजेचे आहे.

Sunil Mendhe and Charan Waghmare
भंडारा झेडपी : राष्ट्रवादीचे राजू देशभ्रतार विजयी, तर देहू नगरपंचायतीवर एकहाती सत्ता...

दुसरीकडे भाजपमधील गटबाजीचे लागलेले ग्रहण निवडणुकीत कमी होते की काय आता जिल्हा परिषदेतील गटनेता निवडताना ही गटबाजी खुलेआम दिसू लागली आहे. भंडाऱ्यात भाजपमध्ये एक गट खासदार मेंढे व आमदार फुके यांच्या गट कमी होता की काय आता माजी आमदार चरण वाघमारे यांना सतत विरोध करत त्यांचा तिसरा गट वरील दोन गटांनी थोपवून घेतला. या गटबाजीला त्रासलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांनी भाजपच्या पार्लामेंट्री बोर्डमधून राजीनामा दिला आहे. तिकीट वाटपात वारंवार झालेला वादंग याला कारणीभूत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत तुमसर विधानसभा क्षेत्रातील गर्रा जिल्हा परिषदेत तीन वेळा जिल्हा परिषदेचा मान मिळविलेल्या संदीप ताले यांना जिल्हा परिषद गट नेतेपदासाठी संधी मिळणार याची खात्रीशीर चर्चा सुरू असताना मात्र तसे न करता पक्षाने भंडारा तालुक्यातील आमगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून पहिल्यांदाच निवडून आलेले विनोद बांते यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

संदीप ताले यांना जिल्हा परिषद प्रशासनाचा दांडगा अनुभव असताना विनोद बांतेसारख्या नवख्या माणसाला गटनेते बनविणे पचनी पडले नाही. दुसरीकडे संदीप ताले, माजी आमदार चरण वाघमारे यांचे अत्यंत निकटवर्ती असल्यानेच चरण वाघमारे यांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत अगोदर विधानसभा व आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत वाढलेल्या गटबाजीमुळे भाजप पक्षाची वाताहत होताना उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. गटबाजी थांबविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे हे वरिष्ठ भाजप नेत्यांना येत्या काळात खूप महाग पडू शकते, यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com