Dr. Mohan Bhagawat : धार्मिक लोकसंख्येतील असंतुलन देशासाठी घातक !

समग्र लोकसंख्येची नीती अवलंबली पाहिजे आणि कसोशीने त्याचे पालन केले पाहिजे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagawat) म्हणाले.
Dr. Mohan Bhagawat
Dr. Mohan BhagawatSarkarnama

नागपूर : जेव्हा जेव्हा एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात. जन्मदरातील विषमतेबरोबरच, लोभ, लालसा, सक्तीचे मतपरिवर्तन, घुसखोरी हीदेखील मोठी कारणे आहेतच. त्यामुळे धार्मिक लोकसंख्येतले असंतुलन देशासाठी घातक आहे. त्यासाठी समग्र लोकसंख्येची नीती अवलंबली पाहिजे आणि कसोशीने त्याचे पालन केले पाहिजे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

नागपुरात (Nagpur) संघाच्या विजयादशमी सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. भागवत (Dr. Mohan Bhagawat) म्हणाले, सन २००० मध्ये भारत (India) सरकारने साकल्याने विचार करून एक लोकसंख्या धोरण आखले होते. २.१ एवढा जन्मदर रहावा, असे एक महत्वपूर्ण उद्दिष्ट त्याद्वारे ठरविण्यात आले होते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा दर पाच वर्षांनी प्रसिद्ध होणारा अहवाल २०२२ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सरकारचे धोरण, सामाजिक जागरूकता आणि सहभाग यांमुळे हे उद्दिष्ट साध्य तर झालेच, पण त्याहूनही कमी, म्हणजे २ एवढा जन्मदर राखण्यात यश आल्याचे हा अहवाल सांगतो.

आपण लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने पुढे जात आहोत, तर आणखी दोन बाबींवर विचार करावयास हवा. समाजशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिकांच्या मते, कुटुंबांचे आकारमान संकुचित झाल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या समस्या निर्माण होत असून सामाजिक तणाव, एकाकीपणा, अशी अनेक नवी आव्हानेही पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे, कुटुंबांच्या व्यवस्थापनावरच एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उमटू लागले आहे. लोकसंख्येचा असमतोल हाही दुसरा एक प्रश्न आहेच. ७५ वर्षांपूर्वी या समस्येचे परिणाम आपण पाहिले आहेत. २१ व्या शतकात याच समस्येमुळे ईस्ट तिमोर, दक्षिण सुदान आणि कोसोवा हे तीन स्वतंत्र देश अस्तित्वात आले.

इंडोनेशिया, सुदान आणि सर्बियातील लोकसंख्येच्या असमतोलाचाच हा परिणाम आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात. जन्मदरातील विषमतेबरोबरच, लोभ, लालसा, सक्तीचे मतपरिवर्तन, घुसखोरी हीदेखील मोठी कारणे आहेतच. या सगळ्याच बाबी एकत्रित विचारात घ्यायला हव्यात. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही. लोकशाहीमध्ये समंजस सहकार्याचे महत्व सगळ्यांनाच ठाऊक आहे. समंजस सहकार्यातूनच नियम तयार होणे, ते मान्य होणे आणि त्यांचे अपेक्षित परिणाम साधणे शक्य होत असते, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.

Dr. Mohan Bhagawat
डॉ. मोहन भागवत यांच्या ‘या’ भूमिकेचे नाना पटोलेंनी केले स्वागत…

ज्या नियमांचे परिणाम त्वरित दिसून येतात, किंवा काही काळानंतर दिसणार असतात, ते समजावून सांगावे लागत नाहीत. पण जेव्हा देशाच्या हिताकरिता स्वार्थत्याग करायची वेळ येते, तेव्हा त्यासाठी समाजाने तयार रहावे, यासाठी समाजात स्वत्व जागृती आणि स्वाभिमान जिवंत ठेवण्याची गरज असते. ही स्वत्वाची भावनाच आपणा सर्वांना एकत्र जोडते. कारण आपल्या पूर्वजांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या सत्याचा हा थेट परिणाम आहे. ‘सर्व यद्भूतं यच्च भव्यं’ ही एक शाश्वत आणि अंतःप्रेरणेतून साकारलेली अभिव्यक्ती आहे. त्यामुळे आपल्या या वैशिष्ट्याचे खंबीरपणे पालन करून विविधता, वेगळेपणाचा आदर केला पाहिजे. ही बाब जगाला समजावून सांगणारा भारत हा एकमेव देश आहे. आपण सारे एक आहोत, त्यामुळे सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपल्या श्रद्धांचे वेगळेपण आपल्याला अलग करू शकत नाही. सत्य, करुणा, अंतर्बाह्य शुचिता, ही चार तत्वे सर्वांच्या एकाच प्रवासाची मार्गदर्शक आहेत. त्यांच्याच आधारे संपूर्ण जगातील जनजीवनास समन्वय, संवाद, सौहार्द आणि शांततामय वाटचालीचा संस्कार देणारी आपली संस्कृती आहे. ती सर्वांना जोडते.

जगाला कुटुम्बभावाच्या नात्याने जोडण्याची प्रेरणा देते. निसर्गामुळे आपण सारेजण जगतो, आपले जीवन समृद्ध होते. यातूनच ‘जीवने यावदादानं स्यात्प्रदानं ततोधिकम्’ ही भावना जागृत राहते. 'वसुधैव कुटुम्बकम्' आणि 'विश्वं भवत्येकं नीडम्' हे भव्य उद्दिष्ट आपल्या पुरुषार्थाची प्रेरणा आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनाचा हा सनातन प्रवाह प्राचीन काळापासून याच पद्धतीने पुढे सरकत आला आहे. काळ

आणि परिस्थितीनुसार त्याचे रूप, मार्ग किंवा शैली बदलत गेली, पण मूळ विचार, ध्येय आणि उद्दिष्ट मात्र तेच आहे. या मार्गावरील वाटचालीची ही सातत्यपूर्ण गती आम्हाला आमच्या असंख्य पराक्रमी वीरांच्या शौर्य आणि समर्पणातून, असंख्य कर्मचाऱ्यांच्या भीमप्रयासातून आणि ज्ञानवंतांच्या दुर्धर तपश्चर्येतून प्राप्त झाली आहे. त्या सर्वांनाच आम्ही आपले आदर्श मानले आहे. ते आपले गौरवस्थानही आहेत, आणि हे आपले पूर्वजच आपणा सर्वांना एकत्र जोडणारा धागा आहेत, असे डॉ. भागवत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in