प्रशांत बंब यांची तक्रार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार...

भाजपच्या (BJP) प्रशांत बंब नावाच्या एका आमदाराने काल शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करण्याची जी मागणी केली, त्याचा मी निषेध करतो, असे नागो गाणार म्हणाले.
Nago Ganar, BJP
Nago Ganar, BJPSarkarnama

नागपूर : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची गरज नाही, हे मतदारसंघ रद्द करा, असे वक्तव्य भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केले. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. बंब यांच्या वक्तव्याचा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांची तक्रार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे करणार असल्याचेही आमदार गाणार यांनी सांगितले.

मी महाराष्ट्र (Maharashtra) राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार आहे आणि शिक्षक आमदार आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) मला समर्थन आहे. त्याच भाजपच्या प्रशांत बंब (Prashant Bamb) नावाच्या एका आमदाराने काल शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करण्याची जी मागणी केली, त्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. कारण हा धोरणात्मक विषय आहे. भारतीय जनता पक्षाचे असे धोरण नाही. त्यामुळे पक्षाचे धोरण नसताना एक आमदार अशी काही मागणी करतो, हे पक्षाच्या शिस्तीत बसणारे नाही. पक्षाने आमदार प्रशांत बंब यांना ताकीद द्यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे शिक्षक आमदार नागो गाणार म्हणाले.

राष्ट्रीय नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) याच मतदारसंघातून नेते बनले, ही बाब कुणातरी आमदार प्रशांत बंब यांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे. स्व. गंगाधरराव फडणवीस हेसुद्धा याच मतदारसंघातून नेते बनले आणि समाजसेवा केली, याचा विसर बंब यांना पडलेला आहे. त्यांनी शिक्षकांचा अपमान करणारे वक्तव्य महाराष्ट्राच्या विधानसभेत केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रात, शिक्षक संवर्गात उमटत आहेत. त्याचा राग आता शिक्षकांमधून व्यक्त केला जात आहे. भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे की, आमदार बंब यांना त्यांनी समज द्यावी.

Nago Ganar, BJP
फडणवीस सरकार व आघाडी सरकार सारखेच : भाजप आमदार नागो गाणार यांचा घरचा अहेर

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रशांत बंब यांच्या त्या वक्तव्याची योग्य दखल घेऊन कारवाई न केल्यास समाजात पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार गाणार म्हणाले. प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर किंवा शिक्षण क्षेत्रावर काय राग आहे, हे माहिती नाही. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी शिक्षकांबाबत, शिक्षण क्षेत्राबाबत बदनामी करणारे वक्तव्य केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि शिक्षक आमदार या नात्याने मी बंब यांचा निषेध करतो. त्यांचा व्यक्तिगत राग कुणावर असेलही, पण त्यासाठी अशी धोरणात्मक मागणी करणे एका आमदाराला शोभत नाही, असे आमदार गाणार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर आमदारांची नितांत गरज आहे, हे बंब यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी आजच तक्रार करणार आहे. बंब यांना समज देऊन भारतीय जनता पक्षाची प्रतिमा साबूत ठेवावी, अशी मागणी तक्रारीतून करणार आहे, असेही आमदार नागो गाणार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in