प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, मी निष्ठावान शिवसैनिक...!’ पक्ष वाचवण्यासाठी सेनेची धडपड

शिवसैनिकांनी स्टॅम्प पेपर लिहून दिलेले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ५० आमदारांना सोबत घेत भाजपच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केले.
Eknath Shinde, Shivsena
Eknath Shinde, ShivsenaSarkarnama

अकोला : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांनी बंड करीत नवी चूल मांडल्याने आता जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

पदाधिकाऱ्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पक्षप्रमुखांविषयी निष्ठा व्यक्त करणारी प्रतिज्ञा लिहून घेतली जात आहे. नुकतेच विदर्भातील (Vidarbha) अनेकांनी मुद्रांक पेपरवर प्रतिज्ञा लिहून आपली निष्ठा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर असल्याचे सिद्ध केले. अकोला ( Akola) जिल्ह्यातील तीन हजारांवर पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातही शिवसैनिकांनी स्टॅम्प पेपर लिहून दिलेले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ५० आमदारांना सोबत घेत भाजपच्या (BJP) पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केले.

शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हेही सुरत येथे गेले होते. दुसऱ्याच दिवशी ते परत आले. शिवसेनेसह त्यांनी अकोल्यात शक्तिप्रदर्शन करीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा केला. आमदार देशमुख यांच्याप्रमाणेच काही आमदारही शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, नंतर त्यातील एक-एक आमदार गळू लागला आहे. काही ठिकाणी नगरसेवकही मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाला जाऊन भेटत आहेत. त्यामुळे शिवसेनेने या बंडाचा धसका घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींकडून १०० रुपयांच्या बाँड पेपरवर आम्ही पक्षप्रमुखांप्रति एकनिष्ठ असल्याची शपथ लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिवसैनिकांची निष्ठा व श्रद्धा कागदातून होतेय व्यक्त!

नाव, वय, पत्ता, शिवसेनेतील पदाच्या उल्लेखासह मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञापत्र घोषित करीत आहे की, माझी शिवसेनेच्या घटनेवर पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श-तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. शिवसेनेच्या घटनेतील उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मी कार्यरत राहील, असे मी प्रतिज्ञापत्र बाँडद्वारे लिहून दिले जात आहे. शिवसैनिकांची निष्ठा व श्रद्धा अशा प्रकारे कागदातून व्यक्त होताना दिसत आहे.

Eknath Shinde, Shivsena
'एकनाथ शिंदे देवाच्या रुपात भेटले' : बिहारच्या मराठी कुटुंबाला रातोरात दिले जीवनदान

शिवसेना वाचविण्यासाठी धडपड..

शिंदे यांच्यासोबत आमदार व काही खासदारही फुटले आहेत. भविष्यात शिवसेना कुणाची, हा प्रश्न निर्माण होऊन कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशा वेळी तळागाळातील शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेल्या शिवसेनेसोबत असल्याचे न्यायालयात सिद्ध करताना शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्राचा उपयोग करून घेता येणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून पक्ष वाचविण्यासाठी सर्व धडपड सुरू असल्याची चर्चा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in