आमदार राजू कारेमोरे घामाचे ५० लाख पोलिस ठाण्यात कसे विसरले?

मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांची तुरुंगातून सुटका झाली असली तरी अश्लील शिवीगाळ प्रकरणातून मुक्तता झालेली नाही.
आमदार राजू कारेमोरे घामाचे ५० लाख पोलिस ठाण्यात कसे विसरले?

MLA Raju Karemore

Sarkarnama

भंडारा : तुमसर-मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले आहे. घामाचे जे ५० लाख रुपये लुटल्यामुळे आमदारांनी पोलिस ठाण्यात आगपाखड केली. हे करताना २ मिनिट ३९ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी घामाच्या ५० लाख रुपयांचा एकदाही उल्लेख केल्याचे दिसत वा ऐकिवात नाही. त्यामुळे ज्यासाठी ते पोलिस स्टेशनमध्ये गेले होते, तेव्हा नेमका हाच मुद्दा बोलायला ते कसे विसरले, हा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांची तुरुंगातून सुटका झाली असली तरी अश्लील शिवीगाळ प्रकरणातून मुक्तता झालेली नाही. आमदारांच्या कृत्याचे समर्थन कुणीही करणार नाही. त्यांना 15 जानेवारीला अंतरिम जामिनाबाबत सुनावणीसाठी पुन्हा भंडारा सत्र न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. त्यावर त्यांचा जामीन कायम ठेवावा की नाही, याचा निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात त्यांना स्वतःच्या जामिनासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागत असल्याने त्याचे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे दुर्लक्ष होणे साहजिक आहे. यामुळेच पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्यावर अजूनही नाराज आहेत. विरोधक या प्रकरणाचे भांडवल करतील आणि निवडणुकीत फायदा घेतील, यात तिळमात्र शंका नाही. आमदारांची सुटका होताच पोलिसांनी 50 लाख रुपये लुटल्याचे ठामपणे सांगितले असून न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात 50 लाखांचे गौडबंगाल अजूनही कायम आहे. या 50 लाखाच्या प्रकरणात व्हायरल झालेला व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. आमदार महोदयांच्या 2 मिनिट 39 सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एकदाही त्यांनी 50 लाख रुपये आणि सोनसाखळी लुटल्याचा उल्लेख केलेला नाही. इतकेच काय त्यांच्या व्यापारी मित्रांनीही याबाबतीत ब्र शब्ददेखील काढल्याचे दिसत वा ऐकिवात नाही. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ‘घामाचा पैसा आहे, काही हरामाचा नाही’, असे आमदारांनी म्हटले आहे. आता घामाचा पैसा पोलिसांनी लुटला असतानासुद्धा आमदारांना याचा विसर पडणे, म्हणजे या आरोपात तथ्य किती, याचा शोध घेण्याची गरज भासू लागली आहे.

आमदारांनी पोलिस स्टेशनमध्ये राडा घातल्यानंतर लगेचच भंडारा उपविभागीय अधिकारी पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल होत आमदारांना विचारपूस करून माहिती जाणून घेतली. तेव्हाही आमदारांनी 50 लाख रुपयांच्या लुटीचा उल्लेख केला नाही. मात्र मध्यरात्री १.३० ते २ वाजताच्या दरम्यान झालेल्या लेखी तक्रारीत 50 लाख रुपये लुटल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या लूट प्रकरणात ते न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 2022 च्या सुरुवातीला भंडारा पोलिस व आमदार कारेमोरे वाद रंगणार आहे.

<div class="paragraphs"><p>MLA Raju Karemore</p></div>
पोलिसांना शिवीगाळ केल्यानंतर आमदार कारेमोरे पडले एकाकी…

ही न्यायालयीन लढाई लढत असताना आमदारांना घामाच्या 50 लाख रुपयांच्या हिशोब प्राप्ती कर विभागाला द्यावा लागणार आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना निवडणूक आयोगाला व दक्षता पथकाला कोणतीही माहिती न देता 50 लाख रुपयांची वाहतूक करण्याचे कारण काय, याचा खुलासाही त्यांना व त्यांच्या ‘जिवलग’ मित्रांना करावा लागणार आहे. त्यांमुळे सध्यातरी आमदार व त्यांच्या व्यापारी मित्रांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आपला जिवलग मित्र यासीन छावरे याच्या मदतीला धावून येणे आमदार महोदयांना चांगलेच महागात पडले आहे. दुसरीकडे भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उर्वरित जागांची निवडणूक 18 जानेवारी होऊ घातली आहे. त्यात राजू कारेमोरे यांच्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत गण असताना या प्रकरणामुळे निवडणुकीकडे त्यांचे दुर्लक्ष होणे, पक्षाला निश्‍चित परवडणारे नाहीये.

या प्रकरणात आमदार-पोलिस वादाला सुरुवात झाली असून याची प्रचिती तुरुंगातून सुटून आल्यावर त्याच रात्री आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये पुन्हा जाऊन तपासणी केली. कोण कोण उपस्थित आहे, कुणाची ड्यूटी आहे, हे त्यांनी तपासले. त्यामुळे सध्यातरी आमदार-पोलिस वाद संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. घडलेल्या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांनी स्ट्रॉंग रूम चे सीसीटीव्ही, मोहाडी पोलिस स्टेशन चे सीसीटीव्ही फुटेज तपासणे गरजेचे आहे. तेव्हाच पूर्णसत्य जनतेसमोर येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.