Prashant Pawar News: सनदशीर मार्गांनी आंदोलन करणारे ब्लॅकमेलर कसे? प्रशांत पवार संतापले...

MLA : विधानसभेच्या कामकाजामध्ये महाराष्ट्रातील कोल वॉशरीजचा प्रश्न आमदारांनी लावून धरला.
Prashant Pawar
Prashant PawarSarkarnama

Agitation against Coal Washies : नागपुरात (Nagpur) नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विधानसभेच्या कामकाजामध्ये महाराष्ट्रातील कोल वॉशरीजचा प्रश्न आमदारांनी लावून धरला. शासनाकडून त्याचे सरकारी उत्तर देण्यात आले, जय जवान जय किसान संघटना सातत्याने डिसेंबर २०१९ पासून कोल वॉशरीजच्या मुद्द्यावर आंदोलन करीत आहे. त्यांना सत्ताधारी ब्लॅकमेल म्हणत आहेत. सनदशीर मार्गांनी आंदोलन ब्लॅकमेकर कसे, असा संतप्त सवाल जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोल वॉशरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ब्लॅकमेलर, असे म्हटलेहोते. ज्या आमदारांनी हिवाळी अधिवेशनात कोल वॉशरीचा विषय लावून धरला, मग तेसुद्धा ब्लॅकमेलर आहेत का? आंदोलन करणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. मग तुमच्या पक्षातले नेते ब्लॅकमेलर आहेत का, असे म्हणत पवार यांनी फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला.

भारतीय जनता पक्ष व बाळासाहेबांची शिवसेना या युतीचे सरकार तेव्हा नव्हते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना (मूळ) या महाविकास आघाडीचे सरकार तेव्हा होते. सातत्याने कोल वॉशरीजमधील भ्रष्ट्राचार, सरकारी यंत्रणेचा भ्रष्ट्राचार, यावर जय जवान जय किसान संघटनेने आवाज उठविला आहे. अॅन्टी करप्शन ब्यूरोकडून त्या सर्व प्रकारची चौकशी झाली आहे. महाजनको, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, राज्य सरकार, पोलिस व केंद्र सरकार, या सर्व शासकीय कार्यालयामध्ये विविध तक्रारी करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

महत्वाची बाब म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कोल वॉशरीजला बंद करण्याची नोटीससुद्धा दिली होती. तसेच महाजनकोने वॉश कोल वापरामुळे कुठल्याही प्रकारची गुणवत्ता वाढली नाही व त्याचा काहीही फायदा नाही, असा शासकीय अहवालसुद्धा दिला आहे. परंतु आघाडी सरकार व विद्यमान सरकारमधील कोणाला तरी फायदा पुरविण्याच्या नादामध्ये कोल वॉशरी बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शासनाला नुकसान होत असूनही व्यापारी व राजकारणी यांच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत आहे. गोंडेगाव कोल वॉशरीजचा मुद्दा तेथील स्थानिक नागरिकांनी उचलून धरला आहे. कोल वॉशरीच्या आजू बाजूच्या सुमारे १००० एकर जमिनी खराब करण्यात आल्या असून हवा, पाणी व शेतीच्या मातीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Prashant Pawar
प्रशांत पवार म्हणाले, महाजेनको व ‘खनिकर्म’च्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक चौकशी करा...

गावक-यांच्या आंदोलनात जय जवान जय किसान संघटना सामील झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस प्रशासनाकडे आपले म्हणणे मांडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे. घोटाळे करणाऱ्या लोकांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कोल वॉशरीजमुळे शासनाचे नुकसान होते की नाही, यासाठी उच्चस्तरीय कमिटी नेमून त्यावर कारवाई करणे गरजेचे असताना, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाबाबत केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. प्रत्येक वेळी यांनी आंदोलन करणा-यांना ब्लॅकमेलर म्हटले, तर मग करायचे काय?

शासनाचे काम कुठेतरी चुकत आहे आणि लोक आंदोलनाच्या माध्यमातून त्या बाबी शासनाच्या लक्षात आणून देण्याची भूमिका बजावत असतील, शासनाने त्याची योग्य दखल घेवून कारवाई करणे गरजेचे असते. हीच लोकशाही आहे. या प्रकरणात शासकीय अधिका-यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली नाही. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी शेतजमिनीवर भेट देऊन गावक-यांशी चर्चा करावी आणि या प्रकरणामध्ये शेतक-यांचे नुकसान झाले की नाही, याचा अहवाल वाचावा, असे आवाहन प्रशांत पवार यांनी केले आहे. सत्ताधारी काहीही म्हणो, पण आम्ही हा संघर्ष अधिक तीव्र करणार आहोत, असेही पवार म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत समन्वयक विजय शिंदे, प्रकाश डोंगरे, मिलिंद महादेवकर, अभिनव फटिंग, निलिकेश कोल्हे आदी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com